Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रजरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाही

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाही

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आंदोलनादरम्यान प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही त्यांनी दिले होते. मात्र, दक्षिण मुंबईतील सार्वजनिक व्यवहार आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

- Advertisement -

आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, प्रस्तावित आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आल्यास सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी नमूद केले आहे. आंदोलनासंदर्भात जरांगे पाटील यांना नोटीस देऊन पुढील कार्यवाहीबाबत बजावले जाणार असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी यापूर्वीच्या मुंबई आंदोलनाचा दाखलाही दिला आहे. मागील आंदोलनावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सीएसएमटी परिसर आणि महानगरपालिका मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. मागील वेळी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक उपस्थित राहतील, या अटीवर परवानगी देण्यात आली होती. मात्र, अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याचे पोलिसांनी आपल्या भूमिकेत नमूद केले आहे.

यंदा मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. उत्सव काळात शहरातील विविध भागांत भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित आंदोलनामुळे गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनासाठी पर्यायी मार्ग किंवा पुढील कायदेशीर पर्यायाबाबत जरांगे पाटील काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : गंगापूर रोडवर झाडांची अनधिकृत छाटणी; काही झाडे बुडापर्यंत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोडवरील (Gangapur Road) काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी झाडांची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा...