मुंबई । Mumbai
वरुणराजाच्या दमदार पुनरागमनाने मुंबईसह उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, अनेक सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईत एका इमारतीचा भाग कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बुधवारी सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली. अनेक लोकल गाड्या जागच्या जागी रुळांवरच थांबून राहिल्या, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्याही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी हजारो नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईतील पावसाचे मुख्य केंद्र ठरणाऱ्या अंधेरी सबवेमध्ये तब्बल पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. यामुळे लिंक रोड आणि स्वामी विवेकानंद (SV) रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. किंग्ज सर्कल, हिंदमाता, आणि कुर्ला परिसरातील सखल भागांतही पाणी साचल्याने मुंबईकरांना संथ गतीने प्रवास करावा लागला.
पावसाच्या दणक्यासोबतच दक्षिण मुंबईतून एक चिंताजनक वृत्त आले. बाबुलनाथ रोडवरील ‘सूर्यप्रकाश’ या म्हाडा सेस असलेल्या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग मंगळवारी रात्री अचानक कोसळला. या दुर्घटनेत ५१ वर्षीय संतोष रामचंद्र भरासकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उर्वरित धोकादायक भाग सुरक्षित केला आहे.
कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेची नियंत्रण कक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे.




