येवला | प्रतिनिधी | Yeola
येवला नगरपालिकेच्या (Yeola Nagarparishad) राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) या महायुतीतील तिन्ही पक्षांचे नगरसेवक शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, राज्य आणि केंद्रात महायुतीचे सरकार विकासाच्या अजेंड्यावर एकत्रितपणे काम करत आहे. त्याच धर्तीवर येवला शहरातही विकासाला (Devlopment) प्राधान्य देण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता नगरसेवकांनी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याची तयारी दर्शविण्यात आली.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे सात नगरसेवक उपस्थित होते. काही नगरसेवक अपरिहार्य कारणांमुळे अनुपस्थित असले तरी तेही लवकरच या प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील विविध प्रभागांतील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपालिका निवडणुकीत (Election) स्थानिक राजकीय समीकरणांनुसार पक्षांनी स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमधून निवडणूक लढविली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी आता येवल्यातही एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शहरातील कोणताही प्रभाग विकासापासून वंचित राहू नये. नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या भागातील नागरिकांना विकासकामांचा समान लाभ मिळाला पाहिजे. विकासात राजकारण न आणता सर्वांना न्याय देण्याची भूमिका महायुतीची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी मागील दोन महिन्यांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती. विधान परिषद निवडणुकीच्या काळातच येवल्यात महायुतीच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला होता. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून येवला शहराच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे) उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार आदी उपस्थित होते.
स्थानिक नेतृत्वावर नाराजी – उपजिल्हाप्रमुख शिंदे
शिवसेना (एकनाथ शिंदे) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करत पक्षातील वाढत्या नाराजीचा मुद्दा ऐरणीवर आणला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट करत, आमची नाराजी पक्षाशी नसून स्थानिक नेतृत्वाशी आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले. तसेच कुणाल दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या बद्दल आम्ही नाराज आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेतील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज होते. ही नाराजी कोणत्याही निवडणुकीच्या निकालामुळे नसून, स्थानिक स्तरावर विकासकामे रखडणे, पदाधिकाऱ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होणे आणि जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्यामुळे निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतल्याचे सांगत शिंदे म्हणाले, भुजबळ यांनी पक्षीय भेदभाव न करता सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची विकासकामे करण्याची भूमिका घेतली. येवल्याचा विकास हेच आमचे ध्येय, असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.




