Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रIsrael - Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय...

Israel – Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय तरुणाचा ड्रोनने घेतला बळी

मुंबई । Mumbai

पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट मुंबईत उमटले आहेत. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या आत्मघातकी ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीक्षित सोलंकी असे या मृत तरुणाचे नाव असून, या युद्धजन्य परिस्थितीमुळे आतापर्यंत तीन भारतीयांना आपला जीव गमवावा लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मूळचा दीवचा असलेला दीक्षित सोलंकी हा व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता आणि कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे ५२ नॉटिकल मैलांवर असलेल्या ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. हा स्फोट इतका भीषण होता की, टँकरच्या इंजिन रूमला तात्काळ मोठी आग लागली. या आगीत होरपळून दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे, कारण महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीसाठी तो गावी आला होता आणि काही दिवसांपूर्वीच पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. मात्र, कामावर परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काळाने त्याच्यावर झडप घातली.

याच संघर्षादरम्यान घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत ‘MV Skylight’ या जहाजावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ला झाला. या जहाजावरील बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दलीप सिंग हे दोन भारतीय खलाशी गेल्या ४८ तासांपासून बेपत्ता आहेत. आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून शोधमोहीम राबवली जात असली तरी, परिस्थिती पाहता या दोघांचाही मृत्यू झाला असावा, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेतली असून दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘MKD Vyom’ टँकरवर दीक्षितसह एकूण २६ क्रू मेंबर्स होते, ज्यात १६ भारतीयांचा समावेश होता. सुदैवाने, इतर २५ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातात व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले वाढले आहेत. यामुळे जागतिक व्यापार विस्कळीत होण्यासोबतच सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. दीक्षितच्या पार्थिवाला भारतात परत आणण्यासाठी आणि बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...