मुंबई । Mumbai
विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयालगत असलेल्या शांता भवन इमारतीत मंगळवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत बाळासह दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बचाव आणि अग्निशमन मोहिमेनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, मंगळवारी (११ ऑगस्ट) रात्री सुमारे १० वाजता शांता भवन या ११ मजली निवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला ही आग लेव्हल-१ स्वरूपाची होती. मात्र काही मिनिटांतच तिची तीव्रता वाढून रात्री १०.१६ वाजता तिला लेव्हल-२ घोषित करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सुमारे दहा गाड्या, रुग्णवाहिका, मुंबई पोलीस आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर रात्री सुमारे १ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, ज्या विकासकाने ही इमारत बांधली त्याचे कुटुंब अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होते. आग लागल्यानंतर घरात काम करणाऱ्या केअरटेकर अंकिता यांनी विकासकाच्या लहान नातवाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. धुरापासून बचाव करण्यासाठी त्यांनी मुलाला घेऊन घरातील एका कोपऱ्यात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड धूर आणि आगीच्या विळख्यात अडकल्याने दोघांचाही श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
या आगीत सुमारे ४,००० चौरस फूट क्षेत्रातील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, एसी युनिट, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग, स्वयंपाकघरातील साहित्य आणि इतर घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. एकूण आठ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांवर कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर नानावटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.




