मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. पक्षातील राजकीय घडामोडी, पवार यांच्या अलीकडील प्रकृतीविषयक चर्चा आणि त्यांच्याबाबत सुरू असलेल्या विविध राजकीय तर्कवितर्कांमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी वडिलांच्या निवृत्तीच्या चर्चांवर दिलेले ठाम प्रत्युत्तर पुन्हा चर्चेत आले आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत राजकारणातून निवृत्त होऊन नव्या पिढीला संधी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी रतन टाटा, अमिताभ बच्चन आणि सायरस पूनावाला यांची उदाहरणे देत वयामुळे काम थांबवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. ‘वय हा निवृत्तीचा निकष कसा असू शकतो?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, अलीकडील राजकीय चर्चांबाबत २३ नोव्हेंबर रोजी सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अधिकृत विधेयकाची प्रत मिळाल्यानंतरच निर्णय जाहीर करू, असे सांगितले आहे.
एकीकडे शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’ सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, यावरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीबाबत सुळे म्हणाल्या की, शरद पवार निवृत्त होणार नाही. कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवणार, शरद पवार यांच्या राज्यसभेची 5 वर्ष अजून बाकी आहेत, तेव्हा शरद पवार निवृत्त कसे होतील? असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
राज्यात सिन्नरसह ९ नवीन अपर तहसीलदार कार्यालय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
संजय राऊत शरद पवारांच्या निवृत्तीच्या वृत्तावर काय म्हणाले?
शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि काम करण्यात गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिवंत ठेवण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यांचे जे राजकीय वारसदार आहेत, त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे.” असे ते म्हणाले.
तर पुढे राऊत म्हणाले, काहींना सत्तेत जाण्याची घाई असेल पण शरद पवार असे कधीही करणार नाहीत,” असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केले होते, त्यामध्ये, “तुम्ही विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,” असे म्हटले होते. त्यानंतर शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या चर्चांना उधाण आले. यावर ते म्हणाले की, “ज्या शरद पवारांनी अडचणीच्या काळात नरेंद्र मोदी यांना मदत केली, तुम्हाला संरक्षण दिले, त्यांचा पक्ष आणि घर तुम्ही फोडले. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोदींचे पंतप्रधानपद वाचवले, ज्या अमित शहांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले, त्यांचा पक्ष तुम्ही फोडला. आता ‘विश्रांती करा, आम्ही देश सांभाळू’ असे म्हणत आहेत. मोदींनी जसा देश सांभाळला आहे, त्यामुळे तर लोक रस्त्यावर उतरली आहेत. त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे असा काही निर्णय घेतील असे वाटत नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.




