पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
गोदावरी नदीपात्राचे पावित्र्य आणि सौंदर्य जपण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रालगतच्या आरक्षित जागांवर ऑइल पेंटने नावे लिहून परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे.यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
छठपूजेनिमित्त नदीपात्रालगत जागा आरक्षित करण्यासाठी काही नागरिकांकडून भिंतींवर तसेच परिसरात ऑइल पेंटने नावे लिहिली जात असल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे गोदावरी परिसराचे विद्रुपीकरण होण्याबरोबरच अस्वच्छतेतही भर पडत आहे. धार्मिक उत्सव साजरे करताना नदीचे पावित्र्य,स्वच्छता आणि पर्यावरणाचे भान राखणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोदावरी नदी ही नाशिकची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असून, तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे नदीपात्रात अथवा परिसरात रंगकाम, कचरा टाकणे किंवा अन्य प्रकारे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक गणेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मुकादम किशोर साळवे, अनिल नेटावटे, आसिफ पठाण, सौरभ गायकवाड, सुरक्षा रक्षक सरला धोरटे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे आरसीपी पथकही तैनात होते. गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




