पुणे | Pune
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात काँग्रेस पक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. परदेशात जाऊन भारताची बदनामी केल्यास पुढील ३० वर्षे काँग्रेसला (Congress) सत्तेपासून दूर राहावे लागेल, असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच, नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या काळात चार आण्याचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा करत, राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारतावर टीका करण्यापेक्षा गावागावात जाऊन जनतेला भेटण्याचा सल्ला दिला.
पुण्यात CRCS च्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटन, ‘भारत टॅक्सी’ सेवेचा आरंभ आणि ‘राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेड’ (NHEC) कंपनीच्या पुनरुज्जीवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्राच्या विकासाचा रोडमॅप मांडत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या ऐतिहासिक सोहळ्याला आणि सहकार क्षेत्राच्या विस्ताराला महाराष्ट्रातून नवी दिशा मिळत असून यामुळे शेतकरी व सहकार क्षेत्राचा विकास वेगाने होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
यावेळी ते म्हणाले, “काँग्रेसच्या काळात महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील शेतकरी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते, मात्र ती कधीही पूर्ण झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांनंतर स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकार क्षेत्राला बळकटी दिली. खासगी टॅक्सी कंपन्यांकडून चालकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ हा सहकाराचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही, तर प्रवाशांचे पैसे थेट चालकांच्या खात्यात जमा होतील”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “मुंबई आणि पुण्यानंतर ही सेवा कोल्हापूर, नागपूर, नाशिक व सोलापूरमध्येही सुरू होणार आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली NHEC कंपनी पुन्हा सुरू करण्यात येत असून, डिसेंबर २०२७ पर्यंत येथे उत्पादन सुरू होईल. येथे केवळ साखर कारखान्यांसाठीच नव्हे, तर रेल्वे, संरक्षण क्षेत्रासाठी कंटेनर, वीज निर्मिती, इथेनॉल आणि CBG निर्मितीचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. जनावरांच्या शेणापासून उत्पन्न मिळवण्यासह शेतकरी व सहकार क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत”, असे शाह यांनी सांगितले.
राहुल गांधींवर टीकास्त्र
राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करताना ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष मागील तीन वर्षांपासून सातत्याने राजकीय पराभवाचा सामना करत असून याच नैराशातून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतविरोधी वक्तव्ये करून देशाची प्रतिमा मलिन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना राहुल गांधी देशाची लोकशाही आणि पंतप्रधानांना बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.




