Monday, September 16, 2024
Homeनाशिकप्लास्टिक बंदीबाबत मनपा व्यापक मोहीम राबविणार

प्लास्टिक बंदीबाबत मनपा व्यापक मोहीम राबविणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दि.1 जुलै 2024 पासून प्लास्टिक बंदीबाबत मनपाची व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने शुक्रवार (दि.28)पासून राज्यातील सर्व महानगरपालिका यांची सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आला. त्यावेळी राज्यात दि. 1 जुलै ते 31 जुलै या कालवधीत सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश सर्व महानगरपालिकांना देण्यात आले.

या बैठकीत प्रवीण दराडे, प्रधान सचिव पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय महाराष्ट्र शासन व अविनाश ढाकणे सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यामार्फत प्लास्टिक बंदी कारवाईचा शहर निहाय आढावा घेण्यात आला.सदर मोहिमेकरिता वार्ड निहाय पथक तयार करून प्लास्टिकच्या निर्मिती स्थानांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर बाबत महानगरपालिकांमार्फत करण्यात येणार्‍या कारवाईचा दैनदिन आढावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमार्फत सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत विभागनिहाय कारवाई करण्यात येणार आहे.याकरिता विभागनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली असून, सदर कारवाईमध्ये मुख्यता फळ व भाजी मार्केट यावर लक्ष केंद्रित करून प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.यासोबतच शहरातील बेकरी, दारूचे दुकाने, मटण मार्केट, फिश मार्केट, मिठाई दुकाने, ज्यूस सेंटर, चाट भांडार, केटरिंग व्यावसायिक, हॉटेल्स आदी ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत तपासणी करण्यात येऊन सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

सदर मोहीम महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व पोलीस विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे.सदर मोहिमेबरोबरच शहरात प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे याकरिता शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच सोशल मीडियाची मदत घेण्यात येणार आहे.

या मोहिमेसह मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आदेशाने तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग नाशिक महानगरपालिकेमार्फत सिंगल युज प्लास्टिकबाबतची कारवाई सुरु करण्यात आली आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालवधीत सिंगल युज प्लास्टिकच्या वापराबाबत एकूण 328 केसेसमध्ये एकूण 17 लाख 40हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला त्याचप्रमाणे 2 हजार 244 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या