अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तब्बल सहा वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवारी आठ पालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांसाठी उमेदवार व मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहिला मिळाली. यावेळी हक्काचे मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. यावेळी बहुतांशी पालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याची जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत अवघे 35 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर तातडीने जोरदार ‘अर्थ’कारण झाल्यानंतर मतदान संपण्यापूर्वी काही वेळेपूर्वी अचानक अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याने रांगा वाढल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, जिल्ह्यातील आठ पालिकांमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 50. 56 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासात साधारणपणे 20 टक्क्यांच्या जवळपास मतदान वाढल्याचा अंदाज होता. यामुळे सायंकाळी साडेपाच तर काही ठिकाणी सात वाजेपर्यंत सरासरी 73 टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. दुपारी चार वाजेनंतर श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव आणि जामखेडमधील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पहावयास मिळाला. शेवगावमध्ये काही मतदान केंद्रावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले. या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी भेट दिली. श्रीगोंदा तालुक्यातील मतदान केंद्रावर उशीरापर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जामखेडमध्ये काही प्रभागात रात्री 7 ते 8 वाजे पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.
जिल्ह्यात आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. या आठ पालिकांसाठी 3 लाख 22 हजार 20 मतदार होते. यात 1 लाख 59 हजार 499 पुरुष तर 1 लाख 62 हजार 455 महिला मतदारांचा समावेश होता. यंदाच्या पालिका निवडणुकीत दररोज नवीन ट्विस्ट पाहयला मिळाला. न्यायालयातील सुरू असलेल्या विविध सुनावणींमुळे शेवटपर्यंत निवडणूका होतील की नाही, या संभ्रमात सर्वजण होते. न्यायालयाच्या आदेशाचा फटका ऐनवेळी 3 पालिका व एका नगरपंचायतला बसला. यामुळे या ठिकाणी ऐन शेवट्याच्या चार दिवसात निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली. यंदा राजकीय पक्षासह अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या उमेदवारांना प्रचारासाठी अवघे सहा दिवस मिळाले. प्रचाराला कमी कलावधी मिळाल्याने उमेदवारांनी उसंत न घेता प्रचार केला. आठही नगर परिषदांमध्ये चुरशीची लढत होती.
यावेळी निवडणुकीत नवीन चेहरे देण्यात आल्याने त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची होती. त्यात जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने सर्व राजकीय पक्षांसह उमेदवारांची धाकधूक वाढली होती. आता आपल्या पालिकेच्या निवडणुकीचे काय होणार. पण आज या निवडणुका झाल्या.सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात अघे 7.31 टक्के मतदान झाले. 23 हजार 545 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर 9.30 ते 11.30 या दोन तासात 19.55 टक्के मतदान झाले होते. मतदारांचा उत्साह फार कमी दिसत होता. मला मतदानाचा हक्क बजावयाचा असे मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले.
मतदानाच्या सुरूवातीच्या चार तासात जामखेडमध्ये सर्वाधिक मतदान झाले होते. तर सर्वात कमी श्रीरामपूर होते. 11.30 ते 1.30 या सहा तासात 35.58 टक्के मतदान झाले होते. यावेळी जामखेडमध्ये 43.38 टक्के सर्वाधिक मतदान झाले होते. तर सर्वात कमी मतदान शिर्डीमध्ये 31.22 टक्क झाले होते. दुपारी मतदानाचा टक्का कमी झाल्याचे दिसून आल्याने जे वाट पाहत होते. त्यांना घराबाहेर काढण्यासाठी अखेर लक्ष्मी दर्शन करण्यात आले.शेवगाव, संगमनेर, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर या पालिकांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मी’ दर्शन झाल्याची जोरदार चर्चा आहे.
साडेतीनपर्यंत 50. 26 टक्के
या निवडणूक स्थानिक असल्याने मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अवघे 50.29 टक्के मतदान झाले होते. या आठ तासात जामखेडमध्ये सर्वाधिक 59.79 टक्के मतदान झाले होते. तर सर्वात कमी मतदान श्रीरामपूर 43.76 टक्के मतदान झाले. संगमनेर 52.16, राहुरी 51.28, राहाता 57.48, श्रीगोंदा 48.1, शेवगाव 52.1, शिर्डी 49.7 टक्के मतदान झाले होते. एकूण 3 लाख 22 हजार 20 मतदारांपैकी 1 लाख 61 हजार 953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.जामखेडला मतदानाचा टक्का चांगला होता. तेथे विधान परिषदेचे सभापती आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्या चुरस आहे. त्याबरोबर शिवसेनेने देखील प्रा.शिंदे यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. त्यामुळे सहाजिक भाजपचे नेते व पदाधिकार्यांची चांगलीच दमछाक पाहिला मिळाली.
सायंकाळी पाचनंतर मतदारांच्या रांगा
सांयकाळी पाच नंतर अचानक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. श्रीरामपूर, संगमनेर, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा या पालिकांच्या कार्यक्षेत्रात मतदारांच्या काही मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे किमान साडेसात वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू होते.
जामखेडमध्ये सभापती शिंदे, आ. पवारांचा तळ
राज्याचे लक्ष असणार्या जामखेड पालिकेमध्ये विधान परिषदेचे सभापती आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मंगळवारी मतदानाच्या दिवशी या ठिकाणी सभापती शिंदे आणि आ. पवार हे तळ ठोकून होते. मतदानादरम्यान दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. निकालानंतर जामखेडमध्ये कोणाचे वर्चस्व हे समोर येणार आहे.
आ. राजळे, घुले यांची मतदान केंद्राला भेट
मंगळवारी शेवगावमधील मतदान प्रक्रीयेदरम्यान भाजप आ. मोनिका राजळे, राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी पालिका मतदान केंद्रांना भेटी देवून उमेदवार व कार्यकर्त्यांकडून राजकीय परिस्थितीचा मागोवा घेतला. दरम्यान दिवसभर शहरात कोणता उमेदवार आघाडीवर? याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू होती. शेवगाव शहरात वर्चस्व कोणाचे हे मतमोजणीनंतर समोर येणार आहे. तोपर्यंत शहरासह तालुक्यात केवळ राजकीय चर्चा रंगलेल्या दिसत होत्या.
कुणी अन् कुठे दगाफटका केला..
अहिल्यानगर जिल्ह्यात आठ नगरपरिषदांचे नवीन कारभारी निवडण्यासाठी काल मतदान झाले. आज होणारी मतमोजणी पुढे ढकलल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. असे असलेतरी आपल्याला कुणी आणि कोणत्या भागात दगाफटका झाला याची रात्री उशीरापर्यंत नेते, उमेदवारांकडून माहिती घेणे काम सुरू होते. तसेच विजयाचे गणित जुळविण्यातही कार्यकर्ते मग्न होते.
शिर्डीत बोगस मतदान
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत एका मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. शोभा सुनील शिंदे या महिला मतदारांचे मतदान त्यांच्या गैरहजेरीत दुसर्याच व्यक्तीने करून गेल्याचे समोर आले. आता याबाबत निवडणूक आयोगाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
मतदानामुळे विवाह सोहळ्यांवर परिणाम
नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी काल मंगळवारी सर्वत्र धामधूम सुरू होती. त्यात कालची लग्नतिथ सर्वत्र दाट असल्याने उमेदवार, त्यांचे समर्थकांना मोठी कसरत करावी लागली. मंगळवारी मतदान असल्याने सोमवारी हळदीच्या कार्यक्रमाला नेते आणि उमेदवारांनी हजेरी लावली. मंगळवारी मतदान असल्याने विवाह सोहळ्यांना गर्दी कमी होती. बहुतेक ठिकाणी विवाह उशीरा लागले.
प्रशासनावरील ताण आणि कार्यभार वाढणार
विधानसभेसाठी साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी होते आणि जवळपास तेवढीच मतमोजणी ठिकाणे नगर परिषद निवडणुकीत आहेत. मात्र, विधानसभेची मतमोजणी मतदानानंतर लगेच एक किंवा दोन दिवसांत होते. आता ही मतमोजणी तीन आठवड्यांनी समोर ढकलली गेल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे तीन आठवडे कार्यरत असणारी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा या नगरपरिषद निवडणुकीसाठी इतका प्रदीर्घ काळ गुंतून राहणार आहे. यामुळे प्रशासनावरील ताण आणि कार्यभार मोठ्या प्रमाणात वाढेल.
मतदानाची टक्केवारी
श्रीरामपूर – 66.62
संगमनेर – 72.75
राहुरी – 72.41
राहाता – 78.47
शिर्डी – 75.16
शेवगाव – अंदाजे 68
श्रीगोंदा – अंदाजे 70
जामखेड – 65 ते 68





