अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर रेखाटलेल्या रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याने झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र, रांगोळी काढून धार्मिक भावना दुखवण्यामागे नेमका उद्देश काय होता, त्यामागे कोणाचा हात आहे, हे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.
नगर शहरातील बारातोंटी कारंजा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकूरावरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोठला भागात छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर केलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. याच पार्श्वभूमीवर महानिरीक्षक कराळे सोमवारी सायंकाळी नगर शहरात दाखल झाले. त्यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळीप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरती संग्राम रासकर व संग्राम रासकर (रा. बारातोंटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संग्राम रासकर याला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात असल्याचे कराळे यांनी सांगितले.
महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर असताना शहरात धार्मिक तणाव वाढत आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी पोलिसांनी बंदोबस्त दिला असताना रांगोळीचा प्रकार त्यांच्या लक्ष्यात आला नाही का?, पोलिसांचा गोपनीय विभाग काय करत होता? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर कराळे म्हणाले, रांगोळी काढून परधर्मियांच्या भावना दुखविण्याचा रासकर दांपत्याचा काय उद्देश होता, त्यांना यासाठी कोणी प्रवृत्त केले होते याचा शोध पोलीस घेत आहेत. रांगोळीविषयी बंदोबस्तावरील पोलिसांना याची माहिती असेल व त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले का? त्यांची चौकशी केली जाईल. पोलीस दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
तसेच कार्यक्रम व तेथे होणार्या घटनेची माहिती पोलिसांच्या गोपनीय विभागाला असणे आवश्यक आहे. गोपनीय विभागाला याविषयी काही कल्पना होता का? असेल तर त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले होते का? याचा तपास देखील करण्यात येईल असे कराळे यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन समाजात, जातीमध्ये तेढ निर्माण होणार्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू पोस्ट केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांना सूचना करण्यात आल्या असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाईल. सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ केली जाईल. तसेच पोलिसांना अधिक सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहिल्यानगर शहरात फिक्स पाईंटवर बंदोबस्त तैनात केला असून आगामी सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे कराळे यांनी सांगितले.
पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
महापालिका निवडणुका तोंडावर असताना शहरात धार्मिक तणावाचे वातावरण तापत आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्तात असताना देखील अशा प्रकारचा प्रकार घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना रांगोळीतील मजकूर दिसला नाही का? त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? गुड मॉर्निंक पथकाच्याही हा प्रकार लक्ष्यात आला नाही का? यावरही कराळे यांनी ठाम भूमिका घेतली. दोषी आढळल्यास संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




