मुल्हेर | वार्ताहर
जय राधाकृष्ण जय कुंजबिहारी मुरलीधर गोवर्धनधारी मन प्रफुल्लित होणारे भजन गात भाविकांतर्फे श्री उद्धव महाराज यांची समाधी असलेले श्री क्षेत्र मुल्हेर येथे प्राचीन परंपरा असलेल्या रासक्रीडा उत्सव सोमवार दि. २६ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेला आणि आजही सुरू असलेला रासक्रीडा हा उत्सव म्हणजे मुल्हेरच्या सांस्कृतिक वैभवातील मानाचा शिरपेच ठरला आहे. कोणत्याही प्रकारचा दांडिया व आधुनिक पद्धतीना तोडत शाखीय संगीतावर आधारित असणारे उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे व ब्रज भाषेतील भजन हे खास वैशिष्ट्य बघण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आदी विविध राज्यातून आलेले भक्त यांचा समन्वयाचा कळस या ठिकाणी दिसणार आहे.
रासक्रीडेची सुरुवात रासचक्राच्या बांधणी पासून सुरू होते. सुमारे २८ फूट व्यासाचे चक्र बांधून दोरीच्या साहाय्याने विणले जाते. त्यात केळीची पाने व झेंडूची फुले लावून चाकाची सजावट केली जाते. हे चाक संपातकाळी म्हणजे चंद्र व सूर्य यांच्या साक्षीने रासस्तंभावर चढविले जाते. यावेळी उपस्थित भाविक श्री उद्धव महाराज की जय असा नाम घोष करत क्षणार्धात चाक रास स्तंभावर चढविणार आहेत रासक्रीडेत एकूण १०५ पदे गायिले जाणार आहे ही पदे अहिराणी, हिंदी, गुजराती, ब्रज व संस्कृत भाषेत आहेत. यात केवळ भक्तीरूपदर्शक भजने नाहीत तर लोक व्यबहार, निसर्ग वर्णन संवाद, सौंदर्य मनोविचार हे देखील आहेत. भजनांचा अर्थ केवळ वर्णन म्हणूनच न बघता त्यात असणारे उत्कट भक्ती रसाने प्राप्त होणारे ज्ञान लक्षात येत असल्याचे तसेच प्रत्येक पदामध्ये असलेला अर्थ व वर्णन पाहता मोठा ग्रंथ तयार होईल. या पदांमध्ये फक्त नवरसांचे नाही तर निसर्गाचे देखील वर्णन आढळत असल्याचे भाविकांनी सांगितले.
शंभर कोटीच्या वसुलीवरुन अनिल देशमुखांवर कारवाई, मग ५०० कोटींच काय? संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र
रासाचे चाक चढविल्यानंतर रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला कृष्ण व इतरांना राधिका व गोपिका बनवून श्रीकृष्णाच्या नामघोषात राम शाळेतून हजारो लोकांच्या उपस्थितीत समाधी मंदिरात नेले जाणार आहे. साधारण रात्री नऊ वाजता आर ती करून कार्यक्रमास सुरुवात होते. तब्बल ११ तास म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत रासाच्या चाकाखाली अनेक रागदारी तील १०५ पदे गायली जातील. रास स्तंभावरून खाली उतरवले जाईल व कितीतरी संकटांना दूर करणारा हा आनंद एका रात्रीत मिळाला या अनामिक भावनेने भाविक एकमेकांचा निरोप घेणार आहे.
यंदाच्या वर्षी दोन दिवस पौर्णिमा असल्याने रासक्रीडा उत्सव सोमवार रोजी मुल्हेर येथील श्री उद्धव महाराज समाधी समोर असलेल्या १४ फूट रास स्तंभावर सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी रासचक्र चढवून सुरू होईल. त्या निमित्ताने या परिसरात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती भक्तराज महाराज, संस्थान प्रमुख किशोर महाराज, श्रीकांत महाराज, सरपंच निंबा भानसे, उपसरपंच बन्सीलाल बत्तीसे, गावातील ग्रामस्थ व श्री उद्भवेश लायटिंग मंडळ, श्री अन्नदान समिती, नाम सप्ताह समिती आदींनी केले आहे.
३७८ वर्षांची अखंडीत परंपरा
रासक्रीडेची परंपरा ही कृष्णभक्त राजा मयूर ध्वजाने श्रीकृष्णाच्या दर्शनापासून मुल्हेर येथे सुरू केली साधारण इ.स. पूर्व ३००० आणि श्री उद्धव महाराजांचे गुरु श्री काशीराज महाराज यांनी सन १६४० साली रासक्रीडेला पुनरुजीवन दिले आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे साधारण ३७८ वर्षापासून अखंडपणे ही परंपरा मयूरनगरीत चालू आहे असे आख्यायिकेनुसार समजत असल्याचे भाविकांनी सांगितले.




