Friday, November 15, 2024
Homeनगरगोंदकर, मुंडे आणि गंधे भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

गोंदकर, मुंडे आणि गंधे भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नियुक्त्या जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)-बैठकीत निवडीवर एकमत न झाल्याने श्रेष्ठींच्या कोर्टात गेलेला भाजप जिल्हाध्यक्ष निवडीचा विषय मार्गी लागला असून राजेंद्र गोंदकर (उत्तर जिल्हा), अरुण मुंडे (दक्षिण जिल्हा) आणि नगरसेवक महेंद्र गंधे (नगर शहर) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पूर्वी नगर शहर (महानगर) आणि ग्रामीण असे दोन जिल्हाध्यक्ष असलेल्या भाजपने यावेळी नगर शहर, दक्षिण जिल्हा आणि नव्याने तयार केलेल्या उत्तर जिल्हा असे तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

या तिनही जिल्हाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (दि. 10) निवडणूक निरीक्षक विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगर शहरसाठी आठ, दक्षिणसाठी चौदा आणि उत्तरसाठी 17 इच्छुकांनी अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर एकमताने निवड करायची असल्याने स्वतःहोऊन माघार घ्यावी, असे आवाहन बागडे यांनी केले. त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने इच्छुकांमधील प्रत्येकी तीन नावे काढून ती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

शुक्रवारी नावे पाठविल्यानंतर सर्वांनाच कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता होती. काल दुपारी बागडे यांनी जिल्हा भाजपला पत्र देऊन नियुक्तीची माहिती दिली. त्यामध्ये नगरसेवक महेंद्र गंधे (नगर शहर जिल्हा), अरूण मुंडे (दक्षिण जिल्हा) आणि राजेंद्र गोंदकर (उत्तर जिल्हा) यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर खा. डॉ. सुजय विखे, मावळते जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा सत्कार केला.

मुंडे कधी इच्छुक होते ?
जिल्हाध्यक्ष निवडीची बैठक झाली, त्यावेळी प्रत्येक विभागातून इच्छुकांची नावे मागविण्यात आली होती. त्यामध्ये नगर दक्षिण जिल्ह्यातून जी चौदा नावे समोर आली, त्यात अरुण मुंडे यांचे नाव नव्हते. एकीकडे इच्छुकांची नावे घ्यायची आणि दुसरीकडे इच्छुक नसलेल्याची निवड करायची, अशातला हा प्रकार आहे. मुंडे यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर काल दिवसभर भाजप कार्यकर्त्यांमध्येच याबाबत आश्चर्य व्यक्त होत होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या