Monday, October 14, 2024
Homeनगरसावधान ! स्पीडब्रेकरमध्ये टाकताहेत खिळे

सावधान ! स्पीडब्रेकरमध्ये टाकताहेत खिळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमधून (Nagar) जाणार्‍या बहुतांश महामार्गांवर वाहनांच्या गतीला मर्यादा असावी म्हणून करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर्समध्ये (गतिरोधक) (Speed ​​Breakers) चक्क खिळे (Nails) टाकण्याचा दळभद्रीपणा वाढू लागला आहे. यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे शहरांतर्गत बालिकाश्रम रस्त्यावरील रबरी स्ट्रीप उखडून त्यांना ठोकलेले खिळे उघडे पडले आहेत. यामुळेही वाहने पंक्चर (Vehicles Punctured) होऊ लागली आहेत. महामार्गांची देखभाल करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग व शहरांतर्गत रस्त्यांची देखभाल करणारी महापालिका (Municipal Corporation) यांचे रस्ते स्वच्छतेबाबतचे अक्षम्य दुर्लक्ष (Ignore) वाहन चालकांना मात्र नाहक त्रास देऊन जात आहे.

- Advertisement -

नगर शहरातून मनमाड (Manmad), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), पुणे (Pune), बारामती (Baramati), सोलापूर (Solapur), जामखेड (Jamkhed), पाथर्डी (Pathardi), कल्याण (Kalyna) असे आठ महामार्ग जातात. यापैकी बहुतांश महामार्ग खासगीकरणातून विकसित होत आहेत. मात्र, नगर शहराच्या हद्दीतून जाणार्‍या या मार्गांची नियमित स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे होणे अपेक्षित असते. पण, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातून जाणार्‍या अनेक महामार्गांच्या कडेला प्लॅस्टिक व अन्य कचर्‍याचे (Garbage) ढीग असतात. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असते. काही ठिकाणी पाण्याची तळीही असतात. आता यात भर पडली आहे ती या रस्त्यांवर असलेल्या स्पीड ब्रेकर्समध्ये खिळे टाकण्याची. कोणी तरी जाणूनबुजून स्पीड ब्रेकर्समध्ये खिळे टाकत असावेत, असा संशय आहे.

स्पीड ब्रेकर्सवरून जाताना वाहनांची गती कमी असते. अशा वेळी एखादा खिळा वाहनाच्या टायरमध्ये घुसून वाहन पंक्चर होते. परिणामी, दुचाकी वाहन चालकाचे वाहन ढकलत नेऊन पंक्चरवाला शोधण्यात व त्याच्याकडून पंक्चर काढून घेऊन पुन्हा मार्गस्थ होण्यात किमान दोन तास जातात. शिवाय आर्थिक भुर्दंडही पडतो. चारचाकीवाल्यांचे हाल तर विचारता सोय नाही, असे होतात. गाडीला स्टेपनी असली तरी ती बदलण्यात बराच वेळ जातो. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील मुकुंदनगर वळणावर व मनपा मुख्यालयाच्या समोरच्या परिसरातील बहुतांश स्पीड ब्रेकर्समध्ये खिळे पडलेले असतात. ते टाकणारे समाजविघातकच आहेत. मात्र, या रस्त्यांची रोजच्या रोज स्वच्छता झाली तर स्पीडब्रेकर्समधील खिळेही काढून टाकले जाऊ शकतात. दरम्यान, स्पीड ब्रेकर्समध्ये खिळे टाकण्याचे उद्योग त्याच परिसरातील पंक्चरवाले तर करीत नाहीत ना, याचाही शोध घेण्याची गरज वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

हिरा पॅलेसजवळ 32 खिळे
सावेडीमधील रहिवासी कार्तिक क्षीरसागर यांनी नगर-मनमाड मार्गावरील (Nagar Manmad Highway) एमआयडीसी उड्डाण पुलाजवळील (MIDC Bridge) हॉटेल हिरा पॅलेससमोर वळणावर असलेल्या दोन्ही बाजूच्या स्पीड ब्रेकर्समधून चक्क 32 खिळे वेचून काढले. असे ते दर आठवड्याला करतात व दरवेळी किमान 25 ते 30 खिळे या स्पीडब्रेकर्समध्ये नक्कीच सापडतात, असा त्यांचा दावा आहे. ते खिळे वेचत असताना अनेक वाहन चालकही त्यांना स्पीड ब्रेकर्समधील खिळे (Nails) दाखवतात. प्रशासनाने या किरकोळ पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरजही क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. या खिळ्यांच्या विषयाचा व्हीडीओही त्यांनी केला व सोशल मिडियात तो व्हायरल केल्यावर नेटकर्‍यांनी असे खिळे टाकणार्‍यांच्या अकलेचे वाभाडे काढले आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या