नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात कौटुंबिक हिंसाचारातून नात्यांमधील ओलावा संपत चालल्याचे वास्तव समोर आले आहे. पंचवटीतील (Panchvati) अमृतधाम परिसरात केवळ ‘कामवाली मावशी का आली नाही?’ या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात (Attack) झाले. संतापलेल्या सुनेने ५३ वर्षीय सासूला चक्क फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ‘युनायटेड इंजिनिअर सोसायटी’ मध्ये घडली आहे.
अमृतधाम येथील रहिवासी उज्ज्वला बाळासाहेब मोराडे (५३) या मुलगा व सुनेसह वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरात धुसफूस सुरू होती. मात्र, रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या सुमारास वादाचा भडका उडाला. घरातील कामवाली मावशी कामावर न आल्याने सासू-सुनेत शाब्दिक चकमक सुरू झाली. रागाच्या भरात संशयित सून तेजश्री भूषण
मोराडे हिने सासूला शिवीगाळ केली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बंदुकीच्या धाकावर संसार; पतीने पत्नीला पळवले
दरम्यान, हा वाद इतका विकोपाला गेला की सुनेने सासूचे केस धरून फरफटत नेले. त्यानंतर कपाटातून फिनाईलची बाटली काढून ती बळजबरीने त्यांच्या तोंडाला लावली. ‘फिनाईल प्यायल्याने मृत्यू (Death) होऊ शकतो’ याची जाणीव असतानाही क्रूरतेचा कळस गाठत तिने सासूला ते पाजण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत फिनाईल पोटात गेल्याने उज्ज्वला मोराडे यांची प्रकृती खालावली.
घरातील सदस्यांचे जबाब
या प्रकारानंतर पीडित सासूने तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी (Police) दखल घेत संशयित सून तेजश्री मोराडे हिच्याविरुद्ध ‘जीवे ठार मारण्याचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सखोल तपास सुरू असून घरातील सदस्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
हे देखील वाचा : Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी





