Tuesday, October 27, 2026
HomeनगरRahuri : नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा; लांबच लांब रांगा

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीचा बोजवारा; लांबच लांब रांगा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे तसेच चिंचोली फाटा ते कोल्हार या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रविवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा याच मार्गांवर वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असताना वाहतुकीचे प्रभावी नियोजन नेमके कुठे हरवले, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

रविवारी दुपारच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. त्यानंतर वाहनांची संख्या वाढत गेल्याने काही ठिकाणी वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला. दुपारपासून सुरू झालेली कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब झाला, तर काहींना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला. तसेच अनेक रुग्णवाहिकाही यामध्ये अडकल्याने रुग्णांना वैद्यकिय सेवा उशिरा मिळाली.

रविवारच्या त्रासातून सुटका होत नाही तोच सोमवारी सकाळी पुन्हा त्याच मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली. रोज या मार्गावरून प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांसाठी ही समस्या आता डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोंडी नेमकी कोणत्या कारणामुळे होत आहे, ती सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि भविष्यात ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडे काय नियोजन आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी तसेच शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांची अनेक वाहने नगर-मनमाड महामार्गावरून प्रवास करतात. त्यात दिवाळीच्या सणाची भर पडल्याने महामार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढत आहे. महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अहिल्यानगरकडे जाणारे काही प्रवासी शिंगणापूर फाटा, कोंढवड, सडे-वांबोरी मार्गाचा वापर करत आहेत. वांबोरीहून अहिल्यानगरकडे जाणार्‍या मार्गाचाही पर्याय स्वीकारला जात आहे. तसेच राहुरीहून कोल्हारच्या दिशेने जाणारे अनेक प्रवासी गुहा आणि तांभेरे मार्गे प्रवास करत असून, काही जण देवळाली प्रवरा श्रीरामपूर मार्गाचा आधार घेत आहेत.

मात्र, पर्यायी मार्गांचा वापर केल्याने प्रवासाचे अंतर वाढते, वेळ अधिक लागतो आणि इंधनाचा खर्चही वाढतो. शिवाय, सर्वच प्रवाशांना पर्यायी मार्गांची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होते. महामार्गावरून सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी नागरिकांना वारंवार मार्ग बदलण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगर-मनमाड महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असताना कोंडी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याची टीका प्रवासी वर्गातून केली जात आहे. वाहतुकीचा ताण वाढणार्‍या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करणे, वाहनांची ये-जा नियंत्रित करणे, अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून देणे आणि पर्यायी मार्गांची माहिती वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

विशेषतः दिवाळीच्या काळात बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांकडे जाणार्‍या वाहनांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक पोलिसांनी आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. कोंडी निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य गर्दीच्या ठिकाणी आधीच यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, वाहनांच्या रांगा वाढत राहतील आणि प्रवाशांचा मनस्तापही कायम राहील. वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ वाहनांच्या रांगांपुरता मर्यादित नाही. या कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता, अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणार्‍या नागरिकांची होणारी गैरसोय आणि वेळेवर कामावर पोहोचण्यास होणारा विलंब या बाबीही गंभीर आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

Akole : भंडारदरा उच्चस्तरीय कालव्याचे आवर्तन सुरु होण्याची आशा

0
अकोले |प्रतिनिधी| Akole भंडारदरा धरणातून रविवारी सकाळी 11-30 वाजता वीज निर्मिती केंद्रातून 815 क्युसेक्सने नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विसर्ग सोडतेवेळी धरणात 10...