Wednesday, September 9, 2026
HomeनगरCrime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा इशारा

Crime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा इशारा

नगर । तालुका प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन करताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविल्यास संबंधित गणेश मंडळासह डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच डीजे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी दिला.

- Advertisement -

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६९ गावे येतात. या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नगर तालुका पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वारुळे बोलत होते. गणेशोत्सवात पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे. गावागावांत भजन, कीर्तन, व्याख्याने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव अधिक विधायक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन वारुळे यांनी केले.

‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. ही संकल्पना प्रभावीपणे राबविणाऱ्या गावांना बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. गावातील डीजे बंदीसाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे वारुळे यांनी सांगितले. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना त्रास होतो. ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण टाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून डीजे वाजविला जात असल्यास नागरिकांनी तत्काळ नगर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.

ताज्या बातम्या

15 ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरु करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध

0
पुणे | प्रतिनिधी Pune राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने आगामी ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, साखर 'रिकव्हरी' घटल्याने एफआरपीवर बसणार...