Tuesday, September 8, 2026
Homeदेश विदेशसरन्यायाधीशांच्या हातून पदवी घेण्यास विद्यार्थ्यांचा नकार, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

सरन्यायाधीशांच्या हातून पदवी घेण्यास विद्यार्थ्यांचा नकार, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

हैदराबाद । Hyderabad

देशाच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते कायद्याची (LLB/LLM) पदवी मिळणे ही कोणत्याही विधी विद्यार्थ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद आणि स्वप्नवत बाब मानली जाते. परंतु, हैदराबाद येथील नामांकित ‘नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च’ (NALSAR) विद्यापीठात एका वेगळ्याच अभूतपूर्व वादाला तोंड फुटले आहे. विद्यापीठाच्या आगामी पदवीप्रदान समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांच्या एका गटाने थेट नकार दिला असून, त्यांच्या निमंत्रणाचा पुनर्विचार करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisement -

विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि प्राध्यापकांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात नमूद केल्यानुसार, सरन्यायाधीशांनी भूतकाळात ‘कॉक्रोच’ (झुरळ) संदर्भात केलेले वादग्रस्त विधान आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या व्हिडिओबाबत ‘पाहण्यास वेळ नाही’ असे दिलेले वक्तव्य, यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठी नाराजी आहे. या विधानांमधून न्यायाधीशांची विद्यार्थ्यांप्रति असलेली उदासीनता दिसून येते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हस्ते शैक्षणिक व भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली पदवी घेणे आम्हाला योग्य वाटत नाही, असे विद्यार्थ्यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या मते, सरन्यायाधीशांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे म्हणजे घटनात्मक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूलभूत मूल्यांशी तडजोड करण्यासारखे आहे. हे पत्र केवळ काही व्यक्तींचे नसून पदवी घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते, असा दावा करत प्रशासनाने या निमंत्रणाचा तात्काळ पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या खळबळजनक पत्रानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सरन्यायाधीशांच्या कॉक्रोचबाबतच्या विधानानंतरच अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाने एका उपरोधिक मोहिमेची सुरुवात केली होती. अल्पावधीतच या मोहिमेचे एका मोठ्या तरुण चळवळीत रूपांतर झाले. या चळवळीतूनच दिल्लीतील जंतरमंतर येथे अभूतपूर्व आंदोलन उभे राहिले, ज्याच्या दबावामुळे तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या काही दशकांत तरुणाईच्या ताकदीचे दर्शन घडवणारे हे एक मोठे आंदोलन ठरले होते. याच घटनेची पार्श्वभूमी असल्याने NALSAR मधील विद्यार्थ्यांनी घेतलेली ही भूमिका आता देशभरातील शैक्षणिक आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे.

ताज्या बातम्या

Manisha Khatri : सिंहस्थ कामात चूक दाखवा, नाव बदलेन; सिंहस्थ कामांवरील...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून (Nashik Municipal Commissioner) सुरू असलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या रस्ते व पायाभूत सुविधा कामांवरून सुरू...