मुंबई | Mumbai
राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणावरुन एकीकडे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधताना मोठे विधान केले आहे.
“नरहरी झिरवाळ आदिवासी असल्यानेच त्यांच्या कार्यालयात कारवाई झाली, नाहीतर सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू आहे,” असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका मांडली आहे. “माझा संबंध आढळल्यास मी 100 टक्के राजीनामा देईन,” असे ते म्हणाले आहेत. पण, यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे.” अशी मागणी केली.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात; आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना
आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला गेला
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. “सरकारमधील प्रत्येक विभागात असा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला गेला. आम्ही किती स्वच्छ असे दाखवण्याचा हे प्रयत्न करत आहेत,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “शासनाच्या प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे उघड सत्य आहे,” असेही ते म्हणाले आहेत.
१६ तारखेपर्यंत एसीबीची कोठडी
दरम्यान, मंत्रालयातून अटक करण्यात आलेले अन्न व औषध प्रशासनाचे लिपिक राजू ढेरिंगे यांची 16 तारखेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ढेरिंगे यांच्यासोबत या लाचप्रकरणात कोणा वरिष्ठांचा सहभाग आहे का? याचा तपास करायचा असल्याची माहिती एसीबीने कोर्टात दिली. त्यामुळे, 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याची माहिती समोर येते आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.





