Tuesday, December 3, 2024
Homeनगरलंघे आणि मुरकुटे अजूनही सामान्य कसे ?

लंघे आणि मुरकुटे अजूनही सामान्य कसे ?

मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांचा सवाल

माका |प्रतिनिधी|Maka

कोणतीही निवडणूक आली की लंघे आणि मुरकुटे उमेदवारी करतात. त्याचवेळी आम्ही सर्वसामान्य आहोत. आमच्याकडे निवडणूक लढायला पैसा नाही, असा कांगावा ते करतात. सभेच्या, दौर्‍याच्या ठिकाणी लोकांकडून निवडणूक निधी म्हणून पैसे गोळा केल्यासारखे दाखवितात. त्यांची ही दिशाभूल आणखी किती काळ चालणार? असा सवाल मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी प्रचारदौर्‍यात केला.

- Advertisement -

कार्यकर्ता मेळाव्यात लंघे आपली लढाई ही ‘साखर विरूध्द भाकर’ असल्याचे व आपण सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याचे म्हणाले होते याचा समाचार घेताना उदयन गडाख म्हणाले, विठ्ठलराव लंघे यांची ही तिसरी विधानसभा निवडणूक आहे. ते दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. गडाखसाहेबांच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून लाल दिव्याच्या गाडीचा उपभोगही घेतला. ते तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. याशिवाय ते अनेक वर्षे साखर कारखान्याचे संचालक राहिले आहेत. असे असताना ते गरिब, सर्वसामान्य आणि भाकरीवाल्यांचे प्रतिनिधी कसे असू शकतात ?

बाळासाहेब मुरकुटे हे देखिल आपली लढाई प्रस्थापितांविरूध्द असल्याचे कायम ओरडून सांगतात. ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. त्यांना पण गडाख साहेबांच्या मदतीनेच मार्केट कमिटीचा पदाधिकारी होण्याची संधी मिळाली. पुढे दगाबाजी करून ते वेगळे झाले. ते 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाले. तेंव्हापासून त्यांचे राहणीमान, गाड्या, बंगले यात झालेला बदल तालुक्यातील जनता बघते आहे. त्यांनी सगेसोयर्‍यांच्या नावावर भक्कम संपत्ती जमा केल्याचा आरोप लोक करीत असतात तरी ते अजून मी गरीब आणि रस्त्यावर फिरणारा गरजवंत असल्याचा आव कसा काय आणतात ? असे तुवर म्हणाले.

यावेळच्या निवडणूकीत मात्र मतदारांनी या दोन्ही उमेदवारांच्या भूलथापांना आणि गरिब सर्वसामान्य असल्याच्या सोंगांना बळी पडू नये. यांनी सत्तास्थानी असताना सर्वसामान्यांसाठी काय काम उभे केले? हे त्यांना ठणकावून विचारावे आणि ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यावर न्यावी. नेवासा तालुक्यात यापूर्वी शंकरराव गडाख यांनीच विकास केला असून तो पुढे सुरू ठेवण्याची क्षमता फक्त त्यांच्यात आहे, असे ते पुढे म्हणाले.

विठ्ठलराव लंघे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अतिशय मोकळ्या हातांनी ‘रसद’ पुरविण्यासाठी एकनाथ शिंदे एक नंबरवर आहेत, अशी चर्चा असते. दुसर्‍या बाजूला बाळासाहेब मुरकुटे यांनी आमदारकीच्या काळात कोट्यवधींची माया जमविली, असा आरोप करणारा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर फिरतो आहे. विशेष म्हणजे तो मुरकुटेंच्याच एका आधीच्या जवळच्या कार्यकर्त्याने व्हायरल केलेला आहे. असे असताना लंघे आणि मुरकुटे गरिबीचे सोंग आणून सर्वसामान्यांकडून पाचशे-हजार रूपये निवडणूक निधी मिळाल्याचे नाटक का करीत आहेत? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या