मुंबई | Mumbai
राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचा कारभार सांभाळणारे नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा काही कमी झालेली नाही. शरद पवार यांच्याबद्दलचा आदर ते वेळोवेळी बोलून दाखवत असतात. यावेळीही झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलचं विधान केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा झिरवाळांनी व्यक्त केली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध खात्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर झिरवाळ यांनी आज मंत्रालयातील कार्यालयाचा ताबा घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान केले. हनुमानाची झाती फाडल्यानंतर प्रभू श्रीराम दिसले. तसेच माझी छाती फाडल्यानंतर शरद पवार दिसतील. पांडुरंग हा गरीबांचा देव आहे. मात्र, शरद पवार हे आमचे देव आहेत, असे विधान झिरवाळांनी केले आहे.
पुढे त्यांनी सांगितले, संपूर्ण देशात पवार कुटुंबाचे वलय खूप मोठे आहे. त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, शरद पवारांनी गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी, समाजासाठी इतकी वर्ष काम करत आहेत. अजित पवार किती कामाचे आहेत, ते फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश मान्य करतो. शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत. ज्या दिवसापासून अजित पवारांसोबत आलो आहे, तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार यांच्यासमोरच गेलेलो नाही. परंतु, आता शरद पवार यांची भेट घेणार, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.
दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असे सांगतानाच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचे स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवले. मला हा निर्णय घ्यायला भाग पडले, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचे अवघड झाले आहे. साहेब विचार करतीलच ना?, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.