नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारकडून (Central Government) उद्या (सोमवार दि. ३० नोव्हेंबर) रोजी संसदेत मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक सादर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या विधेयकावरून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत मतभेद समोर आले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आपल्या पक्षातून फुटून शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या सहा खासदारांना व्हीप (पक्षप्रतोद आदेश) जारी करून नवा राजकीय डाव टाकला आहे.
ठाकरे गटाची मोठी खेळी; फुटीर खासदारांना व्हीप
काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आजच्या बैठकीसाठी आणि उद्याच्या कामकाजासाठी या सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला आहे.
खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
याबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, “लोकसभा अध्यक्षांनी संबंधित खासदारांना केवळ सभागृहात वेगळे बसण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी पक्ष बदलला किंवा दुसरा पक्ष जॉईन केला याबाबत अध्यक्षांनी अद्याप सर्वोच्च न्यायालयात कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आम्ही कायद्यानुसार त्यांना व्हीप बजावला असून, त्याचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली जाईल.
विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद
डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने काल (शनिवार) दिल्लीत बैठक घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे आपल्या पक्षाच्या खासदारांसह दिल्लीत दाखल झाल्या असून त्यांनी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बिलाविरोधातील रणनीती आणि शरद पवार यांच्या पक्षाने घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे आता उद्याच्या कामकाजात ठाकरे गटाचे फुटीर खासदार आणि मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंची चार वाजता पत्रकार परिषद
उद्या संसदेत मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक सादर होणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिंदे सेनेत गेलेल्या सहा फुटीर खासदारांना व्हिप बजावला आहे. तर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या डिलिमिटेशन बिलाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.




