नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या सात वर्षांत (१ जानेवारी २०२० ते २७ नोव्हेंबर २०२६) महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने बजावण्यात आलेल्या ई-चलनातून (E Chalan) सरकारच्या तिजोरीत २,१७६.३२ कोटी रुपयांचा महसूल (Revenue) जमा झाला आहे. या कालावधीत एकूण १.१४ कोटी ई-चलन धाडण्यात आले असून, त्यापोटी ३,५००.७२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यापैकी १,३२४.४० कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम अद्याप वसूल होणे बाकी आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत आकेडवारीनुसार १ जानेवारी २०२० ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीतलराज्यात एकूण १.१४ कोटी चलन वाहनधारकांना पाठविण्यात आली. त्यापैकी ५४ लाख चलन निकाली निघाली असून निकाली निघण्याचा दर ४७.४ टक्के आहे. उर्वरित ६० लाख चलन कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण आकारण्यात आलेल्या ३,५००.७२ कोटी रुपयांच्या दंडापैकी (Fine) २,१७६.३२ कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकूण दंडाच्या ३७.८ टक्के म्हणजेच १,३२४.४० कोटी रुपयांची रक्कम अद्याप थकीत आहे.
निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) कारवाईचा वाटा ८०.०१ टक्के तर परिवहन विभागाचा वाटा १९.९९ टक्के राहिला आहे. ई-चलन प्रणालीद्वारे वाहतूक शिस्त आणण्याचा उद्देश असला, तरी मोठ्या प्रमाणात थकीत असलेली १,३२४.४० कोटी रुपयांची रक्कम वसूल करणे हे परिवहन व वाहतूक पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
न्यायालयीन प्रकरणे
सुमारे ८ लाख चलन प्रकरणे न्यायालयात पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी ५०.० टक्के प्रकरणे न्यायालयात दाखल झाली असून, ४९.१ टक्के प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ०.९ टक्के प्रकरणे न्यायालयामार्फत निकाली निघाली आहेत.
महाराष्ट्र ई-चलन तक्ता
तपशील – नोंद – निरीक्षण
एकूण चलन – १.१४ कोटी सर्व अंमलबजावणी नोंदी
निकाली चलन – ५४ लाख निकाली दर : ४७.४ टक्के
प्रलंबित चलन – ६० लाख कार्यवाहीच्या प्रतीक्षेत
एकूण दंडाची रक्कम – ३,५००.७२ —
वसूल झालेला महसूल – २,१७६.३२ कोटी वसुली दर : ६२.२ टक्के
थकीत दंडाची रक्कम – १,३२४.४० कोटी अद्याप वसूल होणे बाकी




