नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पेठरोडवरील (Peth Road) राहू हॉटेलपासून (Rahu Hotel) काही अंतरावर भरधाव मिक्सर ट्रकवरील चालकाने छाेटा हत्ती वाहनास जाेरदार धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार (Killed) तर एक जण जबर जखमी झाल्याची घटना घडली. संशयित मिक्सर ट्रकचालक पसार झाला असून म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवर्धन गोसावी (रा. विजय चौक, फुलेनगर, पेठरोड), पांडू लाखन (रा. वडुली, ता. कपराडा, जि. वलसाड, गुजरात) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. विनायक ढवळू पवार (रा. राजबारी, पेठ) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास पेठरोडवरील वेरुळकर बंगल्याजवळ रस्त्याच्या (Road) कडेला छोटा हत्तीतून (एमएच १५ इजी १८४७) भाजीपाला खाली उतरवून चालक गोवर्धन गोसावी यांना पांडू लाखन हे भाड्याचे पैसे देत होते.
दरम्यान, त्यावेळी नाशिककडून पेठ रोडकडे जाणाऱ्या भरधाव मिक्सर ट्रकने (एमएच १५ एचएच ६२८४) रस्त्याच्या कडेला असलेले गोसावी, पांडु लाखन व गंगाराम ओतार यांना जोरदार धडक दिली. तसेच छोटा टेम्पोलाही धडक दिली. या अपघातामध्ये गोसावी व पांडु लाखन हे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. तसेच ओतार जखमी झाले. संशयित मिक्सर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. म्हसरुळ पोलिसात (Mhasrul Police) गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक बळवंत गावित तपास करीत आहेत.