मुंबई | Mumbai
स्वत:ला ज्योतिषी म्हणून घेणार्या अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाशिक क्राईम ब्रँच युनिट एकने अटक केली आहे. गुंगीचे औषध देऊन खरातने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर असून, त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात आज हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्यात ५८ व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक खरातने (Ashok Kharat) सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आहेत. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून तो अधिक चर्चेत आला होता. या कथित ज्योतिषाला अत्याचार प्रकरणात अटक झाल्यानंतर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून दूर करावे यासाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावर रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महिलेने फिर्यादीत काय म्हटलंय?
स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात देण्यात आलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले की,”स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास संपादन केला. यानंतर त्याने ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांना सापडले ५८ व्हिडिओ
कॅप्टन खरात याच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्याचे समजते. पोलीस सध्या या जप्त केलेल्या व्हिडिओंची सखोल चौकशी करत असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





