नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निवडणुकीचा (Election) टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने स्वीप उपक्रमातर्गत जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. ईव्हीएमवर (EVM) यापैकी कोणीच नाही अर्थात नोटा हे चिन्ह आणि त्यासमोरील बटणही देण्यात आले आहे. यंदा मात्र नोटाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा २२ हजार ७१९ मतदारांनी नोटाचे बटन दाबत उमेदवाराबद्दल नकारत्मक मतदान केले आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत नोटाला (Nota) ५ हजार ४२९ इतके मतदान घटले आहे. याचाच अर्थ नागरिकांमध्ये जागरूकता आली असून उमेदवारांबद्दल स्पष्ट भूमिका ठेवल्याचे दिसून येत आहे.
नोटा अर्थात वरीलपैकी कोणीही नाही असा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात (Nashik District) त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात सुमारे २८ हजार मतदारांनी (Voter) १४८ उमेदवारांना नाकारले होते. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ३,०९० मतदारांनी नोटाचे बटन दाबले होते. तर सर्वात कमी वापर येवल्यात झाला होता. यंदाच्या निवडणुकीतील प्रचारात उमेदवार आणि त्यांचे चिन्ह ही मतदारांपर्यंत पोहोचल्यामुळे हा फरक झाला असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Winter News : निफाडचा पारा सात अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता
२०१९ मध्ये २८ हजार नोटा
२०१९ मध्ये जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून एकूण १४३ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक १९ उमेदवार रिंगणात होते. तर दिंडोरी मतदारसंघात सर्वात कमी फक्त ५ उमेदवार रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत २८ हजार मतदारांनी नोटाला पसंती दाखवताना १४८ उमेदवारांना नाकारले होते. यंदा मात्र हि संख्या घटली असून २२ हजार ७१९ मतदारांनी नोटाला पसंती दिली असल्याचे समोर आले आहे.
२०१३ साली नोटा सुरु
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आल्यानंतर त्यात नोटा नावाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना २७ सप्टेंबर २०१३ रोजी वरीलपैकी काहीही नाही निवडण्याचा पर्याय असावा म्हणून सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये या पर्यायासाठी एक बटण स्थापित करणे अनिवार्य केले. त्यानंतर याचा वापर सुरू झाला. प्रत्येक मतदानावेळी मतदारांना त्याचा उपयोग होतो, मात्र त्यामुळे केवळ मतदानाचा कौल कळू शकतो त्यातून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही.
मतदारसंघ | २०१९ | २०२४ |
नांदगाव | १२६४ | ७७५ |
मालेगाव मध्य | ११४३ | ११०२ |
मालेगाव बाह्य | १४८५ | १५२२ |
बागलाण | १६५२ | १५७३ |
चांदवड | ११९६ | ४२४ |
येवला | १०२७ | १२२७ |
सिन्नर | १७०९ | १८१३ |
निफाड | १२२१ | १५०१ |
दिंडोरी | २२९८ | १६७३ |
नाशिक पूर्व | ३०९० | ११८९ |
नाशिक मध्य | १४९३ | १६६० |
नाशिक पश्चिम | २११८ | १८११ |
देवळाली | १२४१ | १४०६ |
इगतपुरी | ३०५९ | २२१९ |