नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation) प्रभाग क्र. २९ मधून भारतीय जनता पक्षाशी (BJP) बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करणारे मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांची शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली असल्याचे सांगितले.
प्रभाग २९ मधून छाननीच्या वेळी मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आला होता. यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजप पक्षश्रेष्ठीनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाने वेळोवेळी स्पष्ट सूचना देऊनही शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही.
उलट पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष (Independent) म्हणून निवडणूक रिंगणात उतरून त्यांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा भंग केला. या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा, संघटनात्मक शिस्त व निवडणूक व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत असल्याचा ठपका ठेवत शहाणे यांना सहा वर्षांकरिता पक्षातून निलंबित करण्यात आले.
अलका व कैलास अहिरे यांची भाजपमधून हकालपट्टी
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी नगरसेविका अलका अहिरे व भाजपचे माजी पदाधिकारी कैलास अहिरे यांची भारतीय जनता पार्टीमधुन ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान संबंधितांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून पक्षशिस्तीचा भंग केला तसेच एबी फॉर्म पळविल्याचा गंभीर प्रकार घडवून आणला. भाजपने स्पष्ट सूचना देऊनही त्यांनी अधिकृत भाजप उमेदवार पुष्पावती पवार यांच्याकरिता जाहीर माघार घेण्यास व त्यांना जाहीर पाठिंबा देण्यास अलका अहिरे व कैलास अहिरे यांनी नकार दिला. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनात्मक शिस्तीला तडा गेला आहे. या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीन शिस्तभंगाची कारवाई करत अलका अहिरे व कैलास अहिरे यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.





