Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik Bus Fire News : चांदवडजवळ धावत्या एसटी बसला आग; ५४ प्रवासी...

Nashik Bus Fire News : चांदवडजवळ धावत्या एसटी बसला आग; ५४ प्रवासी बालंबाल बचावले

चांदवड | प्रतिनिधी | Chandwad

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड शहरालगत असलेल्या रेणुकादेवी घाटात आज (मंगळवार) दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. मालेगाव बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) धावत्या बसला अचानक भीषण आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली असून, चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ५४ प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी दीड वाजेच्या सुमारास बस रेणुकादेवी घाटातून जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. आगीची चाहूल लागताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला घेतली. चालक आणि वाहकाने तात्काळ सर्व प्रवाशांना सतर्क करत तातडीने बसबाहेर काढले. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडत नाही तोच आगीने रौद्ररूप धारण केले.

काही मिनिटांतच बसचा कोळसा

आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, केवळ तिचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. सुदैवाने सर्व ५४ प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषद आणि टोल नाक्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे प्रचंड नुकसान झाले होते.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

या घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करत आणि जळालेली बस बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करून दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...