
नाशिक | विजय गिते | Nashik
राजकीय वर्तुळात पक्षांतर आणि बदल वेगाने होत असले, तरी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Nashik City Congress) कार्यालयातील फलकाने मात्र जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक वर्षे झाली, तरीही काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरील फलकावर शहराध्यक्ष म्हणून दिनकर पाटील (Dinkar Patil) यांचेच नाव झळकत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह इतर पक्षांचे पदाधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.
दिनकर पाटील यांनी साधारण वीस वर्षांपूर्वी नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद (Congress President) भूषविले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बसपा त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात त्यांनी मनसेमध्येही सक्रिय कामकाज करत विधानसभा निवडणूक लढविली. सध्या ते नाशिक महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून सक्रिय आहेत. नाशिक शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही काळात अनेक फेरबदल झाले, नवीन नियुक्ता झाल्या.
मात्र, मध्यवर्ती कार्यालयाच्या मुख्य फलकावरच पक्षाला आपल्या माजी अध्यक्षांचे नाव बदलता आले नसेल, तर स्थानिक काँग्रेस कमिटी किती ‘अपडेट’ आहे, असा उपरोधिक टोला विरोधकांकडून लगावला जात आहे. शहर काँग्रेस कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या फलकावरील असलेले फ्लेक्स काढून त्यावर नवीन फ्लेक्स लावण्यासाठी जुना फलक काढण्यात आला आहे. त्यामुळे पेंटिंग केलेले दिनकर पाटील यांचे नाव अजूनही तसेच असल्याचे शहराध्यक्ष बबलू खैरे (Bablu Khaire) यांनी सांगितले.




