Sunday, October 4, 2026
HomeनाशिकHarshwardhan Sapkal : सिंहस्थ मेळ्याच्या नावाखाली मोठे गौडबंगाल; पालकमंत्री महाजनांवर सपकाळांचा घणाघाती...

Harshwardhan Sapkal : सिंहस्थ मेळ्याच्या नावाखाली मोठे गौडबंगाल; पालकमंत्री महाजनांवर सपकाळांचा घणाघाती आरोप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये सिंहस्थ मेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नावाखाली सुरू असलेले मोठे गौडबंगाल आता उघडकीस आले असून, पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाने केलेल्या भ्रष्टाचाराचे बक्षीस म्हणूनच त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला. नाशिक शहरातील विकासकामे आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत नाशिकमध्ये राज्यातील जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि. २४) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते, तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते.

- Advertisement -

सिंहस्थ मेळ्यातील (Simhastha Kumbhmela) कथित भ्रष्टाचारावर न्यायाधीशांनीही गंभीर टिप्पणी केली असल्याचा दावा करत सपकाळ म्हणाले की, सिंहस्थ मेळ्याच्या भ्रष्टाचारातील केवळ एक टक्का निधी शिक्षणासाठी दिला, तरी राज्यातील हजारो शाळा वाचू शकतील. विकासकामांच्या नावाखाली संपूर्ण नाशिक शहर खोदून ठेवण्यात आले असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधताना सपकाळ म्हणाले की, या सर्व प्रकरणातून पळवाट शोधण्याऐवजी नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या पापाचे त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे. सिंहस्थ मेळ्याच्या निधीचा कथित गैरवापर आणि प्रशासकीय मनमानीविरोधात काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘कोचिंग क्लासेसचा मसुदा नव्हे, मूळ आजारावर उपचार करा’

कोचिंग क्लासेससाठी (Coaching Classes) नवीन मसुदा आणण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही सपकाळ यांनी टीका केली. नवीन मसुदा आणण्यापेक्षा शिक्षण आणि भरती प्रक्रियेतील मूळ समस्यांवर उपचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळे तसेच तलाठी आणि ग्रामसेवक भरतीतील पेपरफुटी हेच खरे आजार असून, सरकार आजार सोडून भलताच उपचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदारांची नावे कापण्याचे कारस्थान – सपकाळ

एसआयआरच्या मुदतवाढीची अत्यंत गरज असल्याचे सांगताना सपकाळ यांनी मतदार यादीच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हैदराबाद हाऊस येथे बीएलओंकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली जात असून, अन्यायकारक पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांची नावे कापण्याचे कारस्थान थेट संघाच्या कार्यालयातून रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘हे सर्व काही मुख्यमंत्रीच करत आहेत का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणांवर टीका करताना सपकाळ यांनी विविध निवडणूक आश्वासनांचा उल्लेख केला. दोन कोटी रोजगार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, १०० स्मार्ट सिटी, महिला सुरक्षा आणि रुपयाचे मूल्य याबाबत सरकारने काय साध्य केले, असा सवाल त्यांनी केला. ‘खाणे चालू आहे आणि खाऊ दिले जात आहे’, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतच्या मोदी सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. पुलवामा हल्ल्यातील आरोपी कोण होते, हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणी करत देशाची ही अधोगती का होत आहे, याचा रिपोर्ट कार्ड सरकारने जनतेसमोर मांडावा, असे आवाहन सपकाळ यांनी केले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिस्ती, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मोहन जोशी, शरद आहेर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...