नाशिक | Nashik
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नावाखाली संपूर्ण शहराची दुरवस्था केल्याचा आरोप करत नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या (Nashik City Congress) वतीने आज (सोमवारी) राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली. शहर अध्यक्ष निलेश खैरे (Nilesh Khaire) यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन छेडण्यात आले.
कमिशनखोरी अन् दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त
आंदोलनादरम्यान मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत हल्ला चढवताना निलेश खैरे म्हणाले की, “महापालिकेचे आयुक्त, पदाधिकारी आणि सत्ताधारी हे कुंभमेळ्यासाठी आलेल्या २५ हजार कोटींच्या निधीवर (Fund) डोळा ठेवून बसले आहेत. आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच कंत्राट कसे मिळेल, यातच ते व्यस्त असून नाशिककरांच्या सुरक्षेचा त्यांना पूर्ण विसर पडला आहे. तसेच प्रशासनाकडून खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी लपवली जात असून, खड्ड्यांमुळे मृत पावलेल्या नागरिकांची संख्या ५ नसून १०० हून अधिक आहे, असा आरोप करत प्रशासनाकडून नाशिककरांची दिशाभूल केली जात असल्याचे खैरे यांनी म्हटले.
दरम्यान, शहरात तातडीने खड्डे (Potholes) बुजवून रस्ते पूर्ववत न केल्यास काँग्रेसच्या वतीने मनपा प्रशासनाविरोधात याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनात उल्हास सातभाई, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, अभिजित राऊत, भारत पाटील, जाकीर अत्तार यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congeress Worker) प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, अधिकारी भाऊ, आता तरी पैसे नको खाऊ, ठेकेदार भाऊ, आता तरी पैसे नको खाऊ, कमिशनखोरी करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा तीव्र घोषणा देत राजीव गांधी भवनाचा परिसर दणाणून सोडला होता.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनांतील ३ मुख्य मागण्या
निदर्शनांनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर केले. या निवेदनात प्रशासनाने परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी अट घालण्यात आली आहे.
१) रस्त्यांची तातडीने दुरुस्ती : नाशिक महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरून नागरिकांना दिलासा द्यावा.
२) भरीव मदत व उपचार: खड्ड्यांमुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना जाहीर केलेली तुटपुंजी मदत वाढवून भरीव आर्थिक मदत मिळावी, तसेच जखमींवर मोफत व तातडीने उपचार करण्यासाठी मनपा व राज्य शासनाने मदत करावी.
३) मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : रस्ते खराब राहून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधासारखे (फौजदारी) गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.




