नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) पिंप्री येथील माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी संजय सदू नडगे (वय १७) हा (दि.१२ मार्च) रोजी दुपारी तीनच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. मात्र, तो परत न आल्याने मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी (दि.१३) रोजी त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पंरतु, त्याचा मृतदेह शाळेच्या दोन किलोमीटर अंतरावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.१५) रोजी शाळेमागे सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना संजयचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती पिंप्रीच्या आश्रमशाळेतील शिक्षकांना कळविली. यानंतर त्यांनी तात्काळ त्र्यंबक पोलीस ठाण्यास (Trimbak Police Station) माहिती कळविली असता पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, घटनेनंतर मयत संजयच्या आई-वडिलांना देखील बोलावून घेण्यात आले. तसेच संजयच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे (Police) उभे ठाकले आहे. तर संजयच्या मृतदेहाजवळ (Dead Body) काही आढळले आहे का? याचा तपास सुरु असून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
१२ मार्चला होता संजयचा वाढदिवस
मयत संजय नडगे यांचा १२ मार्चला वाढदिवस (Birthday) होता. शाळेतील दाखल्यावरून त्याची जन्मतारीख १२ मार्च २००९ आहे. यावरून तो वाढदिवसाच्या दिवशी आश्रमशाळेतून निघून गेल्याचे समोर आले. नडगे हा काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी होता. त्याचे दोन भाऊ देखील याच शाळेत शिक्षण घेत असल्याचे समजते. तो त्र्यंबक तालुक्यातील बुरूडपाडा या गावातील रहिवासी असून, त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात. रोजंदारी करण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागत असल्याने आई-वडीलांनी त्याला आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते. तो बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई-वडील त्याचा शोध घेत होते. यानंतर त्याचा मृतदेह शाळेमागे सुमारे दोन किमी अंतरावर आढळून आला.





