नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आदिवासी विकास भवन कार्यालयातून निघणाऱ्या टेंडरमध्ये आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) करण्यास प्रोत्साहित करीत एकाने सेवानिवृत्तास ८ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) प्रतीक उर्फ राधे मदन पाठक (रा. सटाणा) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू तुळशीराम शिरसाठ (६०, रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे व्याही परशुराम अहिरे यांची ओळख संशयित प्रतीक पाठक याच्यासोबत आदिवासी आयुक्तालयात झाली. प्रतीक याने अनेक टेंडरमधून चांगले उत्पन्न मिळते असे सांगत गुंतवणूकदार असल्यास त्याची माहिती देण्यास अहिरे यांना सांगितले. त्यामुळे अहिरे यांनी आरोग्य विभागातून (Department of Health) सेवानिवृत्त झालेल्या शिरसाठ यांना याबाबत सांगितले. शिरसाठ यांनी प्रतीकसोबत संपर्क साधला. त्यावेळी प्रतीकने शिरसाठ यांना आर्थिक फायदा कसा होतो असे सांगत त्याच्या स्वतःच्या पाठक एंटरप्रायजेस नावाच्या खात्यात २६ लाख २५ हजार रुपये घेतले.
त्यानंतर पैसे (Money) गुंतवल्याचे सांगत प्रतीकने शिरसाठ यांना सर्व पैसे पाठवले तसेच गुंतवणुकीवर फायदा झाला म्हणून रोख स्वरुपात ४ लाख ५ हजार रुपये दिले. त्यामुळे शिरसाठ यांचा विश्वास बसल्याने त्यांनी प्रतीकला पुन्हा पैसे दिले. मात्र यावेळेस प्रतीकने पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार फोन करूनही प्रतीकने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिरसाठ यांनी प्रतीक विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. ए. गोडे हे तपास करीत आहेत.
संशयित आदिवासी विकास विभागात कार्यरत
संशयित प्रतीक पाठक हा आदिवासी विकास विभागात (Department of Tribal Development) कार्यरत असल्याचे कळते. त्यादृष्टीने पोलिसांनी पत्रव्यवहार करीत माहिती मागवली आहे. त्याने जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत शिरसाठ यांना गंडा घातला आहे. संशयित प्रतीक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.