नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
सामनगाव रोडवरील (Samangaon Road) सिन्नर फाटा येथील सदाशिव पॅलेस अपार्टमेंटमध्ये असलेल्या इंडिया नंबर वन बँकेच्या एटीएम मशीनवर (ATM Machine) पहाटे चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. अगदी पोलीस चौकीच्या समोरच कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून पळवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, एका रिक्षाचालकाच्या जागरुकतेमुळे हा डाव फसला आणि चोरटे एटीएम मशीन तेथेच सोडून पळून गेले.
मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. चोरटे एटीएमजवळ आले आणि कटरच्या सहाय्याने मशीन तोडण्यास सुरुवात केली. जवळपास अर्ध्या तासात त्यांनी मशीन पूर्णपणे तोडले आणि पिकअप व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षाचालकाने हे संशयास्पद दृश्य पाहिले. रिक्षाचालकाने परिस्थितीचा अंदाज घेत दोन वेळा घटनास्थळावर फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) धाव घेतली. मात्र, चोरट्यांना रिक्षाचालकाचा पाठलाग समजल्याने त्यांनी मशीन पिकअप व्हॅनमध्ये लोड करण्याचा प्रयत्न सोडून मशीन घटनास्थळीच टाकले आणि वाहनासह पळून गेले.
दरम्यान, सिन्नर फाटा (Sinner Phata) पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडत असताना तेथील पोलिसांच्या लक्षात ही घटना कशी आली नाही, यावर आता नागरिकांत चर्चा रंगली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निकजवळ आठ महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे एटीएम फोडले गेले होते. मात्र, त्या प्रकरणात अद्याप पोलिसांना (Police) यश आलेले नाही. यामुळे एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.