Saturday, April 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : खाकी सुस्त, गुन्हेगार मस्त! मोठ्या माशांना 'राजाश्रय'? अटकेच्या 'कथा'...

Nashik Crime : खाकी सुस्त, गुन्हेगार मस्त! मोठ्या माशांना ‘राजाश्रय’? अटकेच्या ‘कथा’ अन् पोलिसांची गुप्तता!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर (Nashik City) पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. महिलांची छेडछाड, भररस्त्यात होणारी वाहनांची तोडफोड, प्राणघातक हल्ले आणि मोकळ्या जागी सुरू असलेले ‘ओपन बार यामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये पोलिसांनी ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहीम राबवून गुन्हेगारांचे कंबरडे मोडल्याचा दावा केला होता. मात्र, आज तोच बालेकिल्ला ढासळताना दिसत असून नव्या गुन्हेगारांनी पोलिसांच्या खाकी वर्दीला थेट आव्हान दिले आहे. केवळ तपासाचा दिखावा न करता, पुन्हा एकदा ‘ऑपरेशन थिएटर’ स्टाईलने धडक कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. अन्यथा, नाशिकची ओळख ‘गुन्हेगारीचे शहर’ म्हणून व्हायला वेळ लागणार नाही.

- Advertisement -

पंचवटीतील (Panchvati) गोदावरी नदीकाठी, मंगळ ग्रह मंदिरासमोर रात्रीच्या वेळी ‘काळ्या कोयत्या’ ऊर्फ विकी जाधव आणि सौरभऊर्फ ‘सॅमसंग’ पोतदार या सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला. त्यांनी दुर्गेश वाघमारे या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले आणि त्याची मोपेड घेऊन पळ काढला. दुसरीकडे, हिरावाडी रोडवर एका मेडिकलमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय अर्चना बागुल यांना प्रफुल्ल भगत आणि शिवाजी भगत यांनी बेदम मारहाण केली. संशयित प्रफुलने त्यांच्या भुवईवर वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. भद्रकालीतील खडकाळी परिसरात तर रिक्षाची काच फोडल्याचा जाब विचारल्यामुळे शोएब सादीक शेख याने एका कुटुंबावरच दगडफेक केली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, गडकरी सिग्नल ते शिंगाडा तलाव या वर्दळीच्या रस्त्यावर सनी जेजुरकर नावाच्या नराधमाने एका तरुणीचा रस्ता अडवून, माझ्याशी लग्न कर, नाहीतर अॅसिड फेकेन, अशी धमकी देत तिची ओढाताण केली.

ही गुप्तता कशासाठी?

पोलीस ठाण्यांसह (Police Station) गुन्हे शाखेची पोलीस पथके सध्या किरकोळ गुन्हेगारांना पकडून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. कौतुक रास्त असले तरी, काही संशयितांपर्यंत पोहोचण्यात पथकांना अपयश आल्याचे दिसते. त्यातच काही मुख्य सूत्रधार आणि सराईत गुन्हेगारांबाबत यंत्रणेने कमालीची गोपनीयता पाळली आहे. हर्षद पाटणकर हा सराईत गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत आहे. खुद्द आयुक्तांनी चॅलेंज देऊनही पथके त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे, बागूल टोळीने सरकारवाडा हद्दीत सप्टेंबरमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणातील म्होरक्या तुकाराम चोथवे याला काही महिन्यांपूर्वीच अटक झाल्याची माहिती समोर आली आहे, परंतु पोलिसांनी (Police) ही बाब लपवून ठेवली. त्याच्या अटकेचा पंचनामा अनेक ठिकाणी कानी पडू लागला आहे. तर लोंढे टोळीच्या गोळीबारात जखमी झालेला वरूण उर्फ गोल्या तिवारी याच्या अटकेबाबतही पोलिसांनी ‘मौन’ पाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा सराईतांना अटक झाल्यावर त्यांची धिंड काढण्याऐवजी ही ‘गुप्तता’ कोणासाठी, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.

स्टॉप अँड सर्च’चा फार्स !

शहरातील गुन्हेगारी (Criminal) रोखण्यासाठी ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम राबवण्याचे आदेश आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही मोहीम केवळ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कार्यालयातून घरी जाणारे नोकरदार किंवा कुटुंबासह फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांचे नाव-पत्ता नोंदवण्याचे सोपस्कार पोलीस पूर्ण करत आहेत. दुसरीकडे, टवाळखोर आणि सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नाकाबंदीचे ठिकाण पाहून आधीच मार्ग बदलतात. मोकळ्या मैदानांमध्ये मद्यपींचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत, पण तिथे कारवाई करण्याचे धाडस पथके दाखवत नाहीत. एकूणच, नाशिकमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून ‘स्ट्रीट क्राईम’चा विळखा घट्ट होत आहे.

ताज्या बातम्या

भय इथले संपेना! दुसरा बिबट्या जेरबंद, आणखी दोन बिबट्यांची पिंजऱ्या भोवती...

0
हनुमंतगाव (वार्ताहर) राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले. गेल्या महिन्यापासून पलघडमल, साबळे वस्तीवर...