सिन्नर | Sinnar
शहरात चेनस्नॅचिंगच्या (City ChainSnatching ) वाढत्या घटनांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) तपासचक्र वेगाने फिरवत एका सराईत गुन्हेगारास अटक केली. त्यामुळे चेनस्नॅचिंगचे गुन्हे उघड होणार आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील सरदवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून धूम ठोकली होती. तर दुसरी घटना २ डिसेंबर रोजी
दुपारच्या सुमारास घडली. सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाऊनशिप, मुसळगाव येथे राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून पोबारा केला होता. या घटनांचा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिसखेलकर यांनी आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना (Police) सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनावरून व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर (ता. श्रीरामपूर) परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार अजय संजय पंडित (१९, रा. वडगाव निपाणी, ता. श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) यास शिताफिने ताब्यात घेतले.
सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याच्या माहितीवरून त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण याच्या साथीने बजाज पल्सर मोटारसायकलवर येऊन सिन्नर शहरात (Sinnar City) चेनस्नॅचिंग केल्याची कबुली त्याने दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून वाट्याला आलेली रोख रक्कम एक लाख पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशिने शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.