चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
बनावट लेटरहेडचा वापर करून कर्मचाऱ्यांचे निलंबन, कारवाईच्या नावाखाली दरमहा पगारातून हप्ता वसुली तसेच निलंबन केलेल्या कर्मचाऱ्याला कामावर घेण्यासाठी पाच हजारांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चांदवड टोल प्लाझावरील (Chandwad Toll Plaza) व्यवस्थापक मनोज पवार याच्याविरुद्ध संचालक सारांश भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडणीसह (Extortion ) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा धुळे पोलिसांनी दाखल करत अटक केली आहे.
अंश रोडवेजचे संचालक सारांश महेंद्र भावसार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगरूळ चांदवड टोल प्लाझाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अंश रोडवेजकडे असून मनोज त्र्यंबक पवार (रा. गणेश कॉलनी, चांदवड) हा सुरुवातीपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. या टोल प्लाझावर कार्यरत कर्मचारी सईदखान (राजू) फिरोजखान पठाण (रा. मुल्लाबाडा, चांदवड) याच्यावर पवारने कर्तव्यात कसूर, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कामाच्या ठिकाणी दारू पिणे, दंगामस्ती करणे, बेशिस्त वर्तणूक करणे असे आरोप ठेवत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पवार हा पठाण यांच्याकडे दर महिन्याला वेतनातून दोन हजार रुपये हप्ता मागत होता. त्याला नकार दिल्याने राजूला २६ जून २०२४ रोजी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर पठाणने वेळोवेळी भेट घेत कामावर (Work) घेण्याची विनंती केली. मात्र निलंबन रद्द करण्यासाठी पवारने पाच हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, ही कारवाई (Action) मागे घ्यावी यासाठी ३ सप्टेंबर २०२४ रोजी पठाण हा संचालक भावसार यांना भेटला. यावेळी निलंबनासाठी वापरलेले लेटरहेड त्यावरील कंपनीचा शिक्का बनावट असल्याचे त्यांना आढळून आले. व्यवस्थापक पवारने अंश रोडवेजचे बनावट लेटर पॅड व शिक्का तयार करून फसवणूक करत हाताखालील कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसूल केली तसेच त्यासाठी या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे भावसार यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी धुळे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून व्यवस्थापकाला अटक (Arrested) करून कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोंधळ नेहमीच चर्चेत
मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) सोमा टोलवे विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. कर्मचारी भरतीतील अर्थकारण, नुकताच गाजलेला फास्ट टॅगच्या नावाने घोटाळा, या सर्वात टोलचा कर भरूनदेखील प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या सुखसुविधांपासून नेहमीच वंचित ठेवले जाते अशा प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एनएचआय च्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने तत्काळ निःपक्षपाती टोलवेची चौकशी करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.