नाशिक | प्रतिनिधी | Panchvati
सराईत व तडीपार गुन्हेगारांच्या (Criminal) संपर्कात राहून त्यांच्यासोबतच गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणाऱ्या शहर पोलीस दलातील अंमलदाराला चांगलेच भोवले आहे. मुंबई नाका पोलिसांच्या (Mmbai Naka Police) हद्दीतील बजरंगवाडीत सन २०२४ मध्ये झालेल्या दंगलीत सहभागी असल्याचा तपासात पोलीस शिपाई इरफान मन्सूर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करून निलंबित केले होते. त्यानंतर आता खात्यांतर्गत चौकशीत दोष सिद्ध झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी इरफानला शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश काढले आहेत.
जुलै २०२४ मध्ये भद्रकाली, खडकाळी व बजरंगवाडीतील सराईतांनी एकमेकांवर शस्त्रांनी चढविलेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात
तीसपेक्षा जास्त संशयित असून, एका गुन्ह्यात संशयित पोलीस इरफान शेख यालाही अटक झाली होती. त्यावेळी इरफान हा आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याला १८ जुलै रोजी अटक झाल्यावर न्यायालयाने (Court) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २० जुलै ते १ ऑगस्टपर्यंत तो न्यायालयीन कोठडीत होता.
दुसऱ्या गुन्ह्यातील संशयित अभिषेक जाधव (रा. बजरंगवाडी) याने न्यायायालयात ‘भांडणावेळी मला एका पोलिसाने मारले आहे, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी इरफानच्या मोबाइल क्रमांकाचे ‘टॉवर लोकेशन’ मिळविले. त्या रिपोर्टनुसार १४ जुलै रोजी रात्री ८.५४ ते ९.०८ या वेळेत इरफान हा घटनास्थळी होता. तसेच इरफानने तडीपार अहमद रजा उर्फ जुबीन जैनुद्दीन सय्यद याला १४ जुलै रोजी फोन करून एका हटिलात बोलावून तेथे ‘ओली पार्टी केली होती.
त्यावरुन गुन्हे उपायुक्तांमार्फत इरफानची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यानुसार सराईत गुन्हेगारांच्या मदतीने गुन्हेगारी वर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचे स्पष्ट झाले. त्याला १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘शासकीय सेवेतून बडतर्फ ही शिक्षा का करू नये, अशी नोटीस आयुक्तालयाने बजावली होती. तर, १३ जून २०२५ रोजी अज्ञांकित कक्षात ‘एक वेळ माफी असावी’, असे कथन त्याने केले होते. परंतु, इरफानचे म्हणणे अस्वीकारार्ह आणि असमाधानकारक असून, त्याने केलेली कसुरी गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे प्रस्तावित शिक्षेत बदल न करता इरफान शेख याला विभागीय चौकशीअंती शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील साठ दिवसांत त्या शिक्षेविरोधात अपिलाची संधी देण्यात आली आहे.
क्षुल्लक वाद अन् एमडी विक्री
बजरंगवाडीत झालेल्या दंगलीत तत्कालीन अंमलदार इरफान शेखचा प्रत्यक्ष सहभाग उघड झाला होता. त्याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केल्यावर सराईत गुन्हेगार जुबीन सैय्यद हा ‘खबरी’ व मित्र असल्याने त्याच्यासोबत घटनास्थळी गेल्याचा दावा त्याने केला होता. संशयित जुबीन व इरफान यांचे ‘कॉल डिटेल्स’ पोलिसांनी जप्त केले होते. मात्र, दंगलीतील इतर संशयित हे इरफानचे ‘खबरी’ होते की मित्र यासंदर्भातील तपास स्वतंत्र करण्यात आला. दंगलीच्या गुन्ह्यात इरफान याला संशयित केल्यापासून तो निलंबित होता. दरम्यान, इरफानचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून त्याचा भाऊदेखील पोलीस कर्मचारी आहे. खडकाळीतील जुबीन सैय्यद याचे बजरंगवाडीतल्या जाधव व ब्राह्मणे या टोळींशी वाद झाले होते. त्यात जुबीन हा एमडी विक्रीतील पेडलर असल्याचे समोर आले होते.




