नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लाॅर्ड बॅडन पाॅवेल यांनी सन १९०७ मध्ये सुरु केलेली ‘स्काऊट्स व गाईड’ (Scouts-Guide) चळवळ भारतात अखेरचा ‘घटका’ माेजत असल्याचे चित्र असतानाच, राज्याच्या शिक्षण खात्यांतर्गत (Education Department) असलेल्या स्काऊट्स आणि गाईडच्या नाशिक शाखेत तत्कालिन जिल्हा संघटकासह लिपिकाने साडेसहा लाख रुपये परस्पर गिळल्याचे समाेर आले आहे.
लेखापरीक्षणात हा ‘झाेल’ उघड झाला असून आता मुंबईनाका पाेलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालिन जिल्हा संघटक राजेंद्र महिरे व कंत्राटी लिपिक रामलाल थोरात अशी संशयितांची नावे आहे. याबाबत, सध्या कार्यरत जिल्हा संघटक कविता समीर वाघ यांनी फिर्याद नाेंदविली आहे. त्यानुसार, सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये महिरे व थाेरात मुंबईनाकास्थित भारत स्काऊट्स व गाईडच्या जिल्हा कार्यालयात कार्यरत असताना त्यांनी, जिल्हा कार्यालयात भरण्यासाठी जमा असलेले सहा लाख ५३ हजार ४५५ रुपये तत्काळ कार्यालयाच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवले.
दरम्यान, वरील कालावधीत नियमित लेखापरीक्षण केले असता, त्यात ही रक्कम कार्यालयाच्या बँक खात्यात जमा नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, जिल्हा कार्यालयाने (District Office) मुंबईतील राज्य कार्यालयास पत्रव्यवहार करुन प्रकार उजेडात आणला. मुंबई कार्यालयाच्या चाैकशीत महिरे व थाेरातने पैशांची ‘अफरातफर’ केल्याचे उघड झाल्यावर चाैकशी करण्यात आली. तेव्हा दाेघांनी सप्टेंबर २०२४ मध्ये अपहार केलेले पैसे तीस दिवसांत नाशिक जिल्हा कार्यालयात भरणार असल्याचे कळवून विनंती केली. त्यानुसार, त्यांनी हे पैसे वेळोवेळी जमा केले आहेत, असे वाघ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक निरीक्षक जितेंद्क वाघ तपास करत आहेत.
बावीस हजारांचा ‘हिशेब’ लागेना…
सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालात २२ हजार २२० रुपये रुपये येणे असल्याचे दिसत असून सन २०२३ मध्ये राजस्थानातील पाली येथे अठरावी राष्ट्रीय जांबोरीसाठी गाईड्सचे गेट तयार करण्याची जबाबदारी नाशिक जिल्हा कार्यालयाकडे देण्यात आली होती. त्याकरीता लागलेल्या आधिकच्या खर्चाची कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय खर्च करण्यात आला. तसेच सन २०११-१२ मध्ये नाशिक जिल्हा संस्थेच्या मैदानावर विविध खेळाची मैदाने तयार करण्यासाठी क्रीडा कार्यालयाकडून दाेन लाख रूपये जिल्हा स्काऊट्स कार्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात आले हाेते. पंरतु या अनुदान व्यतिरिक्त रूपये साडेचार लाख रुपये अतिरिक्त खर्च झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
स्काऊट्स व गाईड्स म्हणजे?
‘भारत स्काऊट्स व गाईड्स’ ही एक स्वयंसेवी, गैर-राजकीय आणि धर्मनिरपेक्ष चळवळ आहे. जी तरुणांच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रित करते. याचे मुख्य उद्दिष्ट तरुणांमध्ये चारित्र्य, स्वावलंबन, नेतृत्व कौशल्ये, सामाजिक सेवा आणि देशभक्तीची भावना रुजवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे हे आहे. ही चळवळ १९०७ मध्ये लॉर्ड बॅडेन-पॉवेल यांनी सुरू केली. जागतिक स्काउटिंग चळवळीच्या तत्त्वांवर ती आधारित आहे.




