नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पत्नीला आत्महत्येस (Wife Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील (Civil Hospital) मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी (दि. १६) पूर्ण झाली आहे. मात्र, अंतिम आदेश नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेले नाहीत. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आदेश राखीव ठेवले असून, आज मंगळवारी (दि. १७) आदेशाची शक्यता आहे.
मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजुरकर (Nilesh Jejurkar) हा ९ मार्चपासून नाशिक शहरातून पसार असून त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा (वय ४०) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर रविवारी (दि. ८) त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सन २०२१ पासून डॉ. नीलेश हा पत्नी मनीषा यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होता.
तसेच घरातील (House) किरकोळ गोष्टींसह निर्णयाबाबत तो एका त्रयस्थ महिलेचा सल्ला घेत होता. तिच्या सांगण्यांनुसार वागत असल्याने कौटुंबिक विसंवाद वाढला होता. नीलेश याने डॉ. मनीषाकडे दुर्लक्ष करून मानसिक त्रास दिला. सततचा मानसिक छळ आणि घरातील कलहामुळे डॉ. मनीषा त्रासलेल्या होत्या. त्यातूनच मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीत आहे. दरम्यान, डॉ. नीलेश याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होणार की, त्याला अटक होईल याकडे अनेकांचे लक्ष आहे.





