Thursday, March 12, 2026
Homeक्राईमNashik Crime : नात्यातील 'सायकॉलॉजी' चुकली! डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल...

Nashik Crime : नात्यातील ‘सायकॉलॉजी’ चुकली! डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल होताच पती फरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा शासकीय रुग्णालयातील (District Civil Hospital) मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Dr. Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणाला खळबळजनक वळण मिळाले आहे. याप्रकरणी पती डॉ. नीलेश यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच, ते अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘सिव्हिल’च्या मानसोपचार विभागप्रमुख महिलेची गंगापूर पोलीस चौकशी करण्याची शक्यता असून वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

लोकांच्या मनातील गुंता सोडवणे ज्यांचा पेशा, त्यांच्याच घरात संवादाऐवजी संशय आणि मानसिक छळाचा धूर निघत होता. ६ मार्च रोजी गंगापूर रोडवरील (Gangapur Road) डीकेनगरात असलेल्या ‘रेवती ब्लू अपार्टमेंट’मध्ये डॉ. मनीषा यांनी जीवनयात्रा संपवली. सुरुवातीला ही घटना केवळ वैयक्तिक नैराश्यातून घडल्याचे वाटत होते, पण तपास चक्रांनी आता जाणीवपूर्वक मानसिक छळवणुकीचे गंभीर वास्तव समोर आणले आहे. धक्कादायक म्हणजे डॉ. नीलेश यांची त्यांच्या वरिष्ठांशी असलेली जवळीक.

मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी वैभव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, “डॉ. नीलेश हे घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट डॉ. महिलेस सांगत होते. इतकेच नव्हे तर, ते घरात स्वतःच्या पत्नीच्या (Wife) मतापेक्षा या महिलेच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागत होते,” असा आरोप आहे. सन २०२१ पासून डॉ. नीलेश यांनी पत्नी मनीषा यांच्याकडे दुर्लक्ष केले. या सततच्या मानसिक छळामुळे आणि पतीची परस्त्रीशी असलेल्या जवळीकीमुळे डॉ. मनीषा मानसिक तणावाखाली होत्या. याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक निरीक्षक हर्षल आहिरराव करत आहेत.

‘सिव्हिल’ च्या वर्तुळात खळबळ

ज्या डॉक्टरांनी अनेकांचे संसार सावरले, त्यांच्याच वैयक्तिक आयुष्यातील या विदारक वास्तवाने नाशिककर सुन्न झाले आहेत. डॉ. मनीषा यांना खरोखरच कोणत्या थरापर्यंत मानसिक त्रास दिला गेला होता? हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. दरम्यान, या प्रकाराने जिल्हा रुग्णालय वर्तुळातही खळबळ उडाली असून आता जेजुरकर यांच्या अटकेनंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

सीडीआर तपासणार…

आता डॉ. नीलेश आणि संशयित डॉ. महिलेच्या संभाषणाचे सीडीआर व एसडीआर तपासले जाण्याची दाट शक्यता असून त्यांच्यातील संपर्क व आणि घटनाक्रम जोडण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहेत. तर, अटकेच्या भीतीने डॉ. नीलेश न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे; त्यामुळे पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. दोघांमधील व्हॉटस्अॅप चॅट्स, मेसेजेस आणि सोशल मीडियातून ‘मानसिक छळा’चे पुरावे शोधले जाणार असून गंभीर गुन्हा पाहता, पोलीस (Police) डॉ. महिलेस सहसंशयित करणार का, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या