नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील फुलेनगरमधील अल्पवयीन बालिकेला पळवून नेत प्रथम शिरपूर (Shirpur) तर त्यानंतर मध्य प्रदेशात नेऊन तिची विक्री करून बालविवाह लावण्यात आल्याची खळबळजनक घटना जून २०२२ मध्ये उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने (Seassion Court) कथित पतीसह चार जणांना बालविवाह, पोक्सो कलमान्वये दोषी ठरवत १० वर्ष सक्तमजुरी व २ लाख ९५ हजार रुपये दंड ठोठावला.
जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश प्रिती घुले यांनी शुक्रवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त अभियोक्ता सुप्रिया गोरे, लीना चव्हाण यांनी सुनावणीदरम्यान सबळ पुरावे सादर करत प्रभावीपणे युक्तिवाद केला. शिक्षा लागलेल्या आरोपींची नावे प्रियंका देवीदास पाटील उर्फ प्रियंका पानपाटील (२५, रा. भगतसिंगनगर, ओझर), सुरेखाबाई नागो भिल (४०, रा. करवंद, गौरव वाईन गार्डन शेजारी, ता. शिरपूर, जि. धुळे), दिनेश सुखराम राठोड (२५, रा. बिहारीलाल हुजबंद, पो. भातखेडी, ता. खाजरौद, जि. उज्जैन), काजल सिध्दार्थ गायकवाड (२४, रा. राहुलवाडी, पेठरोड, पंचवटी) यांना न्यायालयाने दोषी ठरवले.
दरम्यान, यातील फिर्यादी यांची पीडित बालिका ही पुतणी असून १ जून २०२२ रोजी आरोपी काजल हिने तिला भांडी घासण्यासाठी पाठवले होते. तिथून आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण करून शिरपूरला नेले. तिथून पीडितेला मध्य प्रदेशात नेऊन बालविवाह लावला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी केला होता. सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने चौघांना शिक्षा ठोठावली.




