Thursday, June 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : वॉर्डन्सच्याच घामावर मारला डल्ला; सिंहस्थ ड्यूटीतील रोजंदारीत मध्यस्थाचा 'कट'

Nashik Crime : वॉर्डन्सच्याच घामावर मारला डल्ला; सिंहस्थ ड्यूटीतील रोजंदारीत मध्यस्थाचा ‘कट’

सातपूर ट्रॅफिक युनिटमधील आर्थिक घोळ उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थपूर्व विकासकामांमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उन्हातान्हात उभे राहणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन्सला रोजंदारीतही फसवणुकीला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सातपूर ट्रॅफिक युनिटमध्ये नियुक्त महिला व पुरुष वॉर्डन्सच्या मानधनातून तब्बल एक लाख अकरा हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संशयित मंगेश बावस्कर ऊर्फ लकी बाबा (३५, रा. भद्रकाली) याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने ट्रॅफिक पोलिसांसोबत वॉर्डन्सवर ताण निर्माण झाला आहे. चौकाचौकांत उभे राहून धुरात, उन्हात आणि प्रचंड वाहन गर्दीत काम करणाऱ्या या वॉर्डन्सना प्रतिदिन ७५० रुपये मानधन ठरलेले असताना प्रत्यक्षात केवळ ४५० ते ५०० रुपयेच दिले जात होते. उर्वरित रक्कम मध्यस्थ असलेल्या बावस्करने स्वतःजवळ ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे सातपूर ट्रॅफिक युनिटकडील वॉर्डन्सचे मानधन निमा संस्थेमार्फत आर्थिक व्यवहारातून दिले जात होते.

मात्र प्रत्यक्ष पैसे वाटपाची जबाबदारी लकी बाबा याच्याकडे होती. याचाच फायदा घेत त्याने’ऑफिसकडून एवढेच पैसे आले’, ‘उर्वरित रक्कम नंतर मिळेल’, ‘चेक अडकला आहे’ अशा सबबी सांगत अनेक महिन्यांपासून वॉर्डन्सची दिशाभूल केली. दरम्यान, पैशांबाबत जाब विचारणाऱ्या वॉर्डन्सना शिवीगाळ करून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणामागे फक्त मध्यस्थाचा हात आहे की आणखी कुणाचे परस्पर लागेबांधे याचा तपास सातपूर पोलीस करत आहेत. तपास सहायक निरीक्षक गणेशगिरी बुवा करत आहेत.

अशी होती ‘मोडस् ऑपरेंडी’

तपासानुसार, डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रत्येक वॉर्डनकडून रोज काही ना काही कारण देऊन बेकायदेशीररीत्या २०० ते २५० रुपये कपात केली जात होती. संबंधितांना पूर्ण मानधनाची माहिती नसल्याने सुरुवातीला कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र काही वॉर्डन्सनी परस्पर चर्चा केल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळी रक्कम दिली जात असल्याचा संशय बळावला. त्यानंतर निमा कार्यालय आणि ट्रॅफिक युनिटकडील व्यवहारांची चौकशी करण्यात आली असता प्रत्यक्ष मंजूर रक्कम आणि दिलेली रक्कम यात मोठी तफावत आढळून आली. ट्रॅफिक वॉर्डन व तक्रारदार योगेश वाघ यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता बळावली असून, आज...