नाशिक | प्रतिनिधी | Nashik
साडेनऊ महिन्यांपासून शहर पोलिसांसह (Nashik Police) गुन्हे शाखेला गुंगारा देणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर (Harshad Patankar) याने पुन्हा एकदा शहरात डोके वर काढले आहे. जुन्या वादाचे पर्यावसान संघर्षात झाले असून, पाटणकरने चक्क मित्रावर प्राणघातक हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना पंचवटीतील मोरे मळा (हनुमानवाडी) परिसरात रविवारी (दि. १५) रात्री घडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा गैंगवॉरचा भडका उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, हर्षद पोलिसांना सापडतच नसल्याने कार्यक्षमतेसह पोलिसिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गंगापूर भागातील (Gangapur Area) जाधव-पवार आणि पाटणकर गैंगमध्ये गेल्या काही काळापासून वर्चस्ववादातून खुन्नस सुरू आहे. याच जुन्या वादाची ठिणगी रविवारी (दि. १५) रात्री मोरे मळ्यात पडली. फिर्यादी निलेश नंदू रणमाळे हा सराईत असून तो मोरे मळा परिसरात मित्र विकी भडांगे, राहुल रणमाळे, संकेत जोंधळे आणि अभी पाटील हे हनुमान मंदिराजवळ गप्पा मारत असताना दबा धरून बसलेल्या हर्षद पाटणकर आणि त्याच्या साथीदारांनी रणमाळेला घेरले.
रणमाळेला ‘शूट’ करण्याच्या इराद्यानेच पाटणकर टोळी तिथे जमली होती. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्यावेळी संशयितांनी (Suspected) दगड आणि धारदार शस्रांचा वापर करून रणमाळेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रणमाळे जखमी झाला असून, परिसरातील काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. हल्ल्यादरम्यान संशयितांनी कारच्या काचांवर जोरदार दगडफेक केली. काचा फुटल्याने निर्माण झालेला हवेचा दाब आणि त्यातून झालेला आवाज बंदुकीच्या गोळीबारासारखा भासल्याने परिसरात ‘फायरिंग’ झाल्याची अफवा पसरली. मात्र, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील व सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर गोळीबाराचा (Firing) प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. तपास शिरसाठ करत आहेत.
राजकीय दबाव
महापालिका निवडणुकीपूर्वी पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी ओळख निर्माण झाली होती. मात्र, निवडणूक संपताच गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यावर राजकीय दबाव येत असल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात सुरू आहे. यामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा वणवा पेटू लागला आहे.
गुन्हे पथकांचे हात मोकळे…
पाटणकर गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असूनही शहरात सातत्याने गुन्हे करत असल्याने पोलीस आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडली तर जलद प्रतिसाद पथकाचे कमांडो सोबत घ्या, पण पाटणकरला बेड्या ठोका, अशा कड़क सूवना आयुक्तांनी गुन्हे शोध पथकांना दिल्या आहेत. पोलिसांच्या नाकावर टिशून गुन्हे करणाऱ्या या टोळीमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
पाटणकरची ‘कुंडली’…
- सराईत हर्षद पाटणकरविरुद्ध ९ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे
- पाटणकर यापूर्वी तडीपार होता
- जबर दुखापत, चोरी, खुनाचे प्रयत्न, शस्त्र बाळगणे, गोळीबाराचे गंभीर गुन्हे
- पाटणकर आणि राहुल पवार जाधव हे पूर्वाश्रमीचे मित्र, सध्या वर्चस्ववादातून दोघांत टोळीयुद्ध
- पवार टोळीकडून नोव्हेंबर २०२५ मध्ये पाटणकरचा ‘काटा’ काढण्यासाठी बेथेलनगरात गोळीबार
- तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाटणकरला सन २०२३ मध्ये कारागृहात स्थानबद्ध केले होते
- कारागृहातून सुटका झाल्यावर पाटणकरची कारमध्ये बसवून शहरात मिरवणूक
- मिरवणूक परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरुन धिंगाणा करीत मार्गस्थ झाली होती
- मिरवणुकप्रकरणी पाटणकर व कसबे यांना अटक झाली होती
- जुलै २०२४ मध्ये कारागृहातून बाहेर येताच हर्षद पाटणकर पुन्हा गुन्हेगारीत
- संशयित वेदांत चाळगे, गोपाळ नागोरकर आणि शॉन मायकल हे गुन्हेगार हर्षदच्या टोळीत
- एप्रिल २०२४ मध्ये कामटवाड्यात एका अल्पवयीन मुलाचा खून पाटणकरच्या सांगण्यावरुन हत्या झाल्याचा संशय
- २९ जानेवारी २०२६ रोजी लेखानगरात कारची तोडफोड, गोळीबाराचा दावा, पाटणकर टोळीविरुद्ध गुन्हा




