Friday, May 15, 2026
Homeक्राईमNashik Crime : निराधार मुलीने 'लिव्ह इन रिलेशन' मधून दिला बाळाला जन्म;...

Nashik Crime : निराधार मुलीने ‘लिव्ह इन रिलेशन’ मधून दिला बाळाला जन्म; प्रसूतीमुळे ‘पोक्सो’चा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या पंधरा वर्षांपासून ‘निराधार’ जीवन जगणाऱ्या अल्पवयीन मुलीने (Girl) सूरत (Surat) येथे ओळख झालेल्या तरुणाशी ‘लिव्ह इन रिलेशन’ (Live and Relationship) ठेवल्यानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रसववेदना सुरु झाल्याने ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली असता ‘एमएलसी’ नोंदविताना हा प्रकार समोर आला. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी या एमएलसीनुसार, अल्पवयीन मुलीचा मित्र संशयित नरेश शालिकराम राक्षे (रा. गणेशबाबानगर, पुणे रोड, नाशिक) याच्यावर पोक्सो अर्थात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ सह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेतील तरुणी ही सध्या सतरा वर्ष दहा महिने वयोगटातील असून अनेक वर्षांपासून निराधार आहे.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी सूरत येथे गुजराण करत असताना, तिची ओळख नरेश राक्षे या तरुणाशी झाली. त्यानंतर तो तिला नाशिकमध्ये घेऊन आला. दोघे नाशिकरोड, सिन्नरसह गणेश बाबानगरातील निर्माणाधीन सोसायटीत वॉचमनसह मोलमजुरीचे काम करुन ‘लिव्ह इन’ मध्ये राहू लागले. त्यातून ती गरोदर राहिली. ही बाब समजताच काही दिवसांपूर्वी ती प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल झाली. तेव्हा जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल पोलीस चौकीत कायदेशिर वैद्यकीय तक्रार (एमएलसी) नोंद करण्यात आली. तेव्हा तिचे नातलग व कुणीही समोर आले नाही. त्यानंतर तिने प्रकरणाची त्रोटक माहिती नोंदवली.

त्यानुसार, ही माहिती भद्रकाली पोलिसांकडे (Bhadrakali Police) नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपास करुन पीडितेचा जबाब नोंदवला. त्यानुसार, संशयित राक्षे याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असतानासुद्धा शरीरसंबंध ठेवल्याने ती गरोदर राहून प्रसूत झाल्याने गंभीर स्वरुपाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक राम शिंदे करत आहेत. दरम्यान, नवव्या महिन्याच्या प्रारंभीच पीडितेस प्रसवकळा सुरु झाल्याने ती रुग्णालयात दाखल झाली. अकाली जन्मामुळे बाळावर सध्या आरटीओजवळील एका रुग्णालयात आवश्यक उपचार सुरु आहेत.

मुद्दे

  • पीडितेची ओळख पटवणार
  • बेपत्ता असल्याच्या नोंदीची पडताळणी
  • सध्या पीडिता सुखरुप, मात्र बाळावर उपचार
  • संशयितास ताब्यात घेण्याची कार्यवाही
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने गुन्हा
  • ‘लिव्ह इन’ सह अल्पवयीन प्रसूतीमुळे ‘पोक्सो’
  • सन २०२४ ते २०२५ मधील प्रकार

ताज्या बातम्या