नाशिक | प्रतिनिधी | Nashik
म्हसरूळच्या (Mhasrul) कलानगर येथे बिल्डरच्या घरावर गोळीबार (Firing) व दगडफेक केल्याच्या घटनेला २४ तास उलटले तरी हा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न कुणी व का केला हे समोर आलेले नाही. म्हसरूळ पोलिसांची (Mhasrul Police) दोन पथके सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत असून दुसरे पथक टवाळखोर, सराईतांची झाडाझडती घेत आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात अद्याप प्रगती नसून सीसीटीव्ही फुटेजवरच तपास पथकाची भिस्त आहे. दरम्यान, गोळीबारानंतर मिळालेली पुंगळी एअरगनची असल्याचा दावा पोलिसांनी पुनश्च केला आहे.
दिंडोरीरोडवरील (Dindori Road) कलानगर लेन नंबर पाचमधील साईदर्शन रो हाऊसमध्ये साई अंगद उमरवाल (६९) हे कुटुंबासह राहतात. ते सेवानिवृत्त असून त्यांचा मुलगा बांधकाम व्यावसायिक (Construction Professional) आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कुटुंब घरात झोपेत असताना तीन ते चार टवाळखोरांसह काही संशयितांनी त्यांच्या मुलाची कार टार्गेट करून दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. मद्यपी व टवाळखोर असल्याने त्यांनी दुर्लक्ष करत दुसऱ्या दिवशी रिपेअरिंगसाठी कार गैरेजला रवाना केली होती.
त्यानंतर या घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना कळवली होती. या घटनेनंतर शुक्रवारी (दि. ७) पहाटे साडेचार ते पावणेपाच वाजता तिघे संशयित तोंडाला रुमाल लावून दुचाकीवरून आले. त्यांनी उमरवाल यांच्या घरासह आजूबाजूचा कानोसा घेत एकाने दुचाकी मुख्य रस्त्यावर पार्क केली. यानंतर दोघे संशयित (Suspect) चालत आल्यावर संशयिताने उमरवाल यांच्या घराबाहेर उभे राहत सँगमधील गावठी कट्टा काढून उमरवाल यांच्या घराच्या दिशेने हवेत एक राऊंड फायर केला व दुसऱ्याने दगड भिरकावला. यानंतर तिघांनी काही क्षणात पळ काढला. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे.
आर्थिक वाद की खंडणीसाठी धमकी?
उमरवाल यांचा मुलगा बांधकाम व्यावसायिक असून तो जमीन खरेदी-विक्रीचे काम करतो. तसेच कुणाशी नवे-जुने वादही नाहीत, असे कुटुंबाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांना धमकावण्यासह खंडणी उकळण्यासाठी किंवा व्यावसायिक व्यवहाराच्या कारणातून संशयित टोळीने हे दोन हल्ले केले आहेत का की अन्य काही वैयक्तिक कारण आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.