नाशिक | Nashik
स्वत:ला ज्योतिषी म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला नाशिक क्राइम ब्रांच युनिट- १ ने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (Case) दाखल करत आज (बुधवारी) पहाटे चार वाजता खरात याला अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन खरात याच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ व्हिडिओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्याचे समजते. पोलीस सध्या या जप्त केलेल्या व्हिडिओंची सखोल चौकशी करत असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट १ कडे (Crime Branch Unit One) सोपवण्यात आला आहे.खरातचे नेमके कुणाशी संबंध होते आणि व्हिडिओंमध्ये नेमके काय आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अटकेनंतर खरातला न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीत या प्रकरणाचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचा बघितला होता ‘हात’
अशोक खरात हा अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध असून,त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली असता त्यांचा ‘हात’ बघितला होता. तेव्हा खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असल्याचे बोलले जाते. मात्र, आता त्याचा खरा चेहरा उघडा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.





