नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रविवार कारंजा परिसरातील (Ravivar Karanja Area) चांदीचा गणपती मंदिरासमोर शनिवारी (दि. २२) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास टवाळखोरांनी धुमाकूळ घातला. प्रवाशांना सोडून घरी परतणाऱ्या एका ५६ वर्षीय रिक्षाचालकाला (Rickshaw Driver) विनाकारण अडवून, शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर दगड उचलून चालकाच्या पाठीवर आणि कानाखाली मारून गंभीर दुखापत करण्यात आली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा मद्यधुंद व टवाळखोर तरुणांच्या गुंडगिरीचा प्रश्न समाेर आला आहे.
इंदिरानगर (Indiranagar) येथील रहिवासी अल्ताफ मेहबूब खान (वय ५६) हे ऑटो रिक्षाने प्रवाशांना रविवार कारंजा येथे सोडून घरी परतत होते. चांदीचा गणपती मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर आले असता, दुचाकीवरून (क्रमांक MH 15 KT 9649) आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांची रिक्षा अडवली. रिक्षाचालकाने वाद टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी पुन्हा रिक्षासमोर येत त्यांना खाली उतरवले आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
यातील एका उंच, सडपातळ बांध्याच्या व राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून खान यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. तसेच डाव्या कानाच्या खाली मारहाण करून त्यांना गंभीर (Injured) जखमी केले. घटनेनंतर जखमी रिक्षाचालक अल्ताफ खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित वापरत असलेल्या दुचाकीच्या (MH 15 KT 9649) नंबरवरून पोलीस माग काढत आहेत. हवालदार बागुल तपास करत आहेत.
‘नाईट गस्त’ अन् फोलपणा!
रविवार कारंजा हा नाशिकमधील व्यस्त आणि वर्दळीचा भाग मानला जातो. रात्री पावणेनऊ ही वेळ नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या येण्या-जाण्याची वेळ असते. अशा गर्दीच्या ठिकाणी तीन संशयित रस्त्यावर राडा घालतात आणि रिक्षाचालकाला मारतात, यामुळे पोलिसांच्या गस्तीवर चिन्ह निर्माण झाले आहे. “विनाकारण दमदाटी करून शहरात आपली दहशत निर्माण करणे” हाच या टवाळखोरांचा मुख्य उद्देश असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.




