मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात परस्परविरोधी भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (दि. २९) एकाच व्यासपीठावर आले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हे तिन्ही नेते एकत्र आले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा शंभर वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या या पुस्तकातून १८८० पासूनच्या व्यंगचित्रांचा इतिहास आणि या कलेतील विविध टप्पे मांडण्यात आले आहेत. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर हे तिन्ही नेते एकाच मंचावर दिसल्याने या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या चर्चेत नेमके कोणते विषय मांडण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही राजकारणाबरोबरच कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. राज ठाकरे यांची व्यंगचित्रकार म्हणून ओळख आहे, तर उद्धव ठाकरे यांना छायाचित्रणाची आवड आहे. त्यामुळे व्यंगचित्रकलेच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद असताना या तिन्ही नेत्यांची एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली. मात्र, हा कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.




