नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय लष्कराच्या दक्षिणी मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) आणि आहिल्यानगर पोलिसांच्या (Ahilyanagar Police) संयुक्त पथकाने केडगाव परिसरात (Kedgaon Area) कारवाई करत एका हायप्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका बांगलादेशी पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, बेकायदेशीर स्थलांतरित आणि देहविक्रीचा व्यवहार चालवणाऱ्या जाळ्यावर लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने हातोडा मारला गेला आहे.
अहिल्यानगरमधील दीपनगर, केडगाव येथे एका महिलेने इतर महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची अन् त्याद्वारे आर्थिक फायदा घेत असल्याची गाेपनीय माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली होती. त्याचवेळी दक्षिण मुख्यालयाच्या मिलिटरी इंटेलिजन्स, अहिल्यानगरचे पथकही या बेकायदेशीर (Illegal) नेटवर्कवर लक्ष ठेवून होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे (दि. १९) दुपारी लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलीस पथकाने संयुक्तरीत्या छापा टाकला. छाप्यादरम्यान घटनास्थळावरून संशयित सईदा अफसर खान (वय ५४, रा. झेंडा चौक, केडगाव) आणि छोटूराम नारायण राजी (वय ७०, रा. केडगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच तेथून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
प्राथमिक तपासात ही पीडित महिला बांगलादेशी नागरिक (Citizen) असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक पोलीस अधिकारी, अंमलदार, मोबाईल सेलचे कर्मचारी आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाने केली.
बांगलादेशी कनेक्शन अन् पतीची चौकशी
पीडित महिलेची कसून चौकशी केली असता, तिचा पती माेहम्मद टुटुल मुल्ला(वय ३७, मूळ रा. पाईग्राम, ता. जि. खुलना, बांगलादेश; सध्या रा. सातपुते डेअरीजवळ, अहिल्यानगर) हा समोर आला आहे. या प्रकरणात बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि देहविक्रीचे रॅकेट चालवणारे नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय असून, मिलिटरी इंटेलिजन्स आणि पोलीस पथक या दोन्ही यंत्रणा संयुक्तपणे कारवाई करत आहेत.
बेकायदेशीर स्थलांतरावर रोख
लष्करी गुप्तचर यंत्रणा आपल्या कार्यक्षेत्रात बांगलादेशी नागरिकांसह इतर परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर घुसखोरी आणि स्थलांतरावर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे. यापूर्वी जून २०२५ मध्येही एमआयडीसी अहिल्यानगर परिसरात लष्करी गुप्तचर यंत्रणेने अशाच प्रकारची कारवाई केली होती.




